आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एसटी'च्या महिला वाहकावर शिक्षिकेच्या मुलाचा चाकू हल्ला, हल्लेखोराला अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हल्ल्यात जखमी झालेल्या बस वाहक कविता गावंडे. - Divya Marathi
हल्ल्यात जखमी झालेल्या बस वाहक कविता गावंडे.
अमरावती/नांदगाव पेठ - अमरावती ते दाभेरी जाणाऱ्या एसटीबसच्या महिला वाहकाची नांदगाव पेठ येथून बसमध्ये चढलेल्या एका महिला शिक्षिकेसोबत शाब्दिक वाद झाला व सदर शिक्षिका बसमधून खाली उतरली. या शिक्षिकेने ही माहिती तिच्या मुलाला दिली. आईसोबत वाद घालणाऱ्या महिला बस वाहकावर या २७ वर्षीय युवकाने यावली (शहीद) गावात चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले आहे. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. २०) दुपारी घडला आहे. दरम्यान तक्रारीवरून माहुली पोलिसांनी हल्लेखोराला तत्काळ अटक केली.

 

कविता प्रमोदराव गावंडे (३४, रा. वेणी गणेशपुर ह. मु. गोपालनगर, अमरावती) असे जखमी बस वाहकाचे नाव तर कमलेश धनराज सावरकर (२७, रा. यावली शहीद) असे अटक झालेल्या हल्लेखोराचे नाव आहे. कविता गावंडे या मंगळवारी सकाळी ११ वाजता अमरावती येथील मध्यवर्ती स्थानकातून (एम एच ४० एन ९३००) क्रमांकाची एसटी बस दाभेरीकरीता गेली. याच बसवर वाहक म्हणून कविता गावंडे होत्या. दरम्यान नांदगाव पेठ नजीक त्याच मार्गाने जाणारी एक बस नादुरुस्त झाल्यामुळे त्या बसमधील प्रवासी या बसमध्ये चढले. त्यानंतर नांदगाव पेठ येथून पुन्हा काही प्रवासी चढले. यामध्ये एक शिक्षिका बसमध्ये आली. जागा आणि तिकिटांच्या रकमेवरून गावंडे व त्या शिक्षिकेचा चांगलाच वाद झाला. वाद विकोपाला गेल्यामुळे ती महिला शिक्षिका बसमधून खाली उतरली.

 

दरम्यान तीने घडलेला प्रकार २७ वर्षीय मुलगा कमलेश याला सांगितले. गावंडे व इतर प्रवाशांना घेऊन बस पुढे चालत होती. यावली शहीद बसस्थानकावर ही बस पोहोचताच एक युवक बसमध्ये चढला व म्हणाला कि, माझ्या आईसोबत कोणी वाद घातला. असे म्हणून त्याने जवळ असलेला चाकू काढला व गावंडे यांच्यावर सपासप वार सुरू केले.


या वेळी गावंडे यांनी वार चुकवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या हाताच्या पंजाला जबर दुखापत झाली तसेच डोक्याला व शरीरावर अन्य ठिकाणी असे जवळपास पाच ते सहा घाव त्याने केले. या वेळी बसमधील काही प्रवाशांनी मध्यस्थी करून गावंडे यांच्या बचावासाठी धाव घेऊन कमलेशला पकडले, त्यामुळे दोन ते तीन प्रवासीसुद्धा किरकोळ जखमी झाले आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या गावंडे यांना तातडीने माहुलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. तसेच नंतर त्यांना अमरावतीला इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. याचवेळी कविता गावंडे यांच्या तक्रारीवरून माहुली पोलिसांनी कमलेश सावरकरविरुध्द प्राणघातक हल्ला करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण तरणे, धमकी देणे यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक केली आहे.

 

दरम्यान या घटनेची माहिती अमरावतीतील एसटीच्या अन्य कर्मचारी, अधिकाऱ्यांना माहिती झाली. त्यामुळे अनेकांनी माहुलीला धाव घेतली तर दुसरीकडे काही कर्मचाऱ्यांनी झालेल्या घटनेचा निषेध म्हणून अमरावती बसस्थानकातून बसेस बाहेर येण्याचा मुख्य मार्गच काही वेळ बंद करून टाकला होता. संतप्त कर्मचाऱ्यांनी बसस्थानकाचे मुख्य प्रवेशव्दार बंद केल्यामुळे जवळपास १५ ते २० मिनिट बस स्थानकातून एकही बस बाहेर आली नाही. त्यामुळे आगारात प्रवासी ताटकळत बसले. ही माहिती कोतवाली पोलिसांना मिळताच कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटील बसस्थानकात पोहोचले व त्यांनी संतप्त कर्मचाऱ्यांना कायदेशीर मार्गाने निषेध नोंदवा, बसेस थांबवून प्रवाशांची अडवणूक करू नका, असे आवाहन केले. मात्र कर्मचारी नकार देत होते, त्यामुळे पोलिसांनी स्वत: प्रवेशव्दार उघडले. या वेळी काही क्षणासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती मात्र कर्मचाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बसेसला वाट मोकळी करून दिली.

 

महिला वाहकावर हल्ला करणाऱ्याला कठोर शिक्षा व्हावी : दरम्यान या गंभीर घटनेमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त करून काही कर्मचारी अधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षकांना मंगळवारी दुपारी निवेदन दिले. महिला वाहकांसोबत प्रवाशांनी अशा प्रकारे वर्तणूक करू नये, म्हणून या हल्लेखोराला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी निवेनाव्दारे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. या वेळी एस. एम. चव्हाण, एल. एस. महाजन, सी. ए. तायडे, एस. जी. कावरे, एन. डी. मालवनकर, शीतल मोहोड, वैशाली जंवजाळ, एस. व्ही. भारती, बाळासाहेब राणे,अरुण गासे, राजेंद्र खारोडे, प्रवीण अब्रुक, मोहीत देशमुख, मंगेश पंडे, अनिल पांडे, मारोती राठोड आदींची उपस्थिती होती.

 

महादेव गिरींच्या मध्यस्थीमुळे मोठा अनर्थ टळला : गावंडे यांच्या बसमध्येच महादेव गिरी नावाचे प्रवासी प्रवास करत होते. यावली शहीदला बस थांबताच कमलेशने बसमध्ये चढून गावंडे यांच्यावर हल्ला केला. या वेळी गावंडेंवरील हल्ला रोखण्यासाठी महादेव गिरी यांनी जीवाची पर्वा न करता कमलेशला आवरले, त्याचा चाकूही पकडला, या वेळी गिरी यांनाही दुखापत झाली आहे. या वेळी गिरींनी पुढाकार घेतल्यामुळे बसचालकासह आणखी दोन ते तीन प्रवाशांनी कमलेशला पकडले त्यामुळे मोठा अनर्थ टळला, असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

 

तक्रारीवरुन गुन्हा नोंद, हल्लेखोराला अटक
महिला वाहकाच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केला असून, तातडीने हल्लेखोराला अटक केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

- विजय राठोड, ठाणेदार, माहुली जहागिर.

 

बातम्या आणखी आहेत...