आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक खात्यामध्ये बॅलन्स नसल्याने बसतोय भुर्दंड, खात्यातील किमान रकमेबाबत बहुतांश ग्राहक अनभिज्ञ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा - प्रत्येक जण भविष्याचा विचार करून काही ना काही अार्थिक बचत करत असतो. ही बचत करण्यासाठी त्याची पावले आपसूकच बँकेकडे वळत असतात, तर शासनाच्या श्रावण बाळ, संजय गांधी यासह अन्य योजनांच्या लाभाचा पैसाही लाभार्थींच्या बँकेतील खात्यात जमा होत असतो. मात्र विविध योजनांच्या लाभार्थींच्या खात्यात किमान रक्कम नसल्याने शहरातील विविध बँकांनी त्यांच्या अनुदानाची रक्कम दंडात कापणे सुरू केले आहे. हीच बाब सर्वसामान्य ग्राहकांच्या बाबतीतही घडत आहे. मात्र या बाबीपासून लाभार्थींसह ग्राहकही अनभिज्ञ आहेत. बँकांकडूनही याबाबत कोणतीही सूचना देण्यात आली नाही किंवा जन जागृतीही न केल्याने लाभार्थी व ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.

 

शहरातील एसबीआय, एचडीएफसी, युनियन, पंजाब नॅशनल अशा राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते व चालू खात्यांमध्ये ठराविक रक्कम ठेवणे बंधनकारक आहे. ही रक्कम खात्यात नसल्यास त्यावर दंड आकारला जातो. मात्र अनेक बँक ग्राहकांना याची माहिती नसल्याने बँकेने परस्पर ग्राहकांच्या खात्यातून दंडाची रक्कम वसूल केली आहे. जेव्हा विविध योजनेचे लाभार्थी व ग्राहक बँकेत व्यवहार करण्यासाठी गेले, तेव्हा, त्यांना ही बाब निदर्शनास आली.

 

शहरातील युनियन बँकेच्या शाखेत एकता भिंगारे यांच्या खात्यात २५०० रुपये जमा होते. मात्र अलीकडे त्यांनी बँकेचे व्यवहार केले असता, त्यांना खात्यात केवळ २१०० रक्कम कमी दिसली, तर अक्षय काठोळे यांचे स्टेट बँकेत ११२० जमा होते. मात्र आता त्यांच्या खात्यात केवळ ७८४ रुपयेच शिल्लक दाखवत आहेत. किमान शिल्लक रक्कम नसल्याने ही दर महिन्याला बँकेद्वारे ग्राहकांच्या खात्यातून परस्पर ७० रुपये वसूल केले जात आहेत. हाच प्रकार शहरातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सुरू आहे. अनेक खातेदारांना याची माहिती नसल्याने त्यांच्या खात्यातील रक्कम परस्पर कपात करण्यात येत आहे. बँकेने याबाबत माहिती द्यावी किंवा जनजागृती करावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. दोन पैशाचा फायदा होईल, या आशेने ग्राहक बँकेत गुंतवणूक करतात, मात्र खात्यात असलेले पैसे बॅलन्सच्या नावाखाली बँक परस्पर कापून घेत आहे. याचा सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

 

बँकेत सूचना फलक लावलेले आहे
बँकिंग नियमानुसार ग्राहकांच्या दोन्ही खात्यामध्ये किमान शिल्लक रक्कम असणे आवश्यक आहे. अन्यथा दर महिन्याला तसा दंड आकारून रक्कम वसूल केली जाते. त्या संदर्भात ग्राहकांना माहिती व्हावी म्हणून सूचना फलक लावले आहे. प्रत्येक ग्राहकाला तोंडी माहिती देणे शक्य नाही.
- रसिक शाह, व्यवस्थापक, कृषी शाखा, एसबीआय.

 

ग्राहकांना एसएमएस नाही की सूचना नाही
बँकेकडून ग्राहकांना तोंडी किंवा मोबाइलच्या माध्यमातून कुठलीच सूचना किमान शिल्लक रकमेच्या अनुषंगाने देण्यात आली नाही. एसएमएसही पाठवले जात नाही. मात्र खात्यातून परस्पर ही रक्कम कपात केली जात आहे. किमान रकमेबाबत बँकेने योग्य ती माहिती ग्राहकांना द्यायला हवी.
- प्रसन्न काठोडे, सावळी, ग्राहक.

 

निराधारांच्या खात्यातून रक्कमही कपात
शासनाकडून अनुदान प्राप्त होणाऱ्या अनेक लाभार्थींच्या खात्यात दर महिन्याला ६०० रुपये अनुदान जमा होते. त्या रकमेतूनच उदरनिर्वाह चालतो. त्यात प्रामुख्याने संजय गांधी, श्रावण बाळ, शेतमजूर, एमआरजीएस, विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप आदी खात्यांमधून ही रक्कम कपात केल्या जात असल्याने या ग्राहकांपुढे नवीन समस्या निर्माण झाली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...