आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती- बनावट किंवा खोट्या व्यक्तीचे कागदपत्र सादर करून त्यावर खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घ्यायचे. त्या आधारे नवीकोरी दुचाकी खरेदी करायची. त्यानंतर बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत ही दुचाकी विक्री करायची. हा गोरखधंदा मागील जवळपास दीड ते दोन वर्षांपासून नागपूर व शहरातील काही ठकबाजांकडून सुरू होता. दरम्यान, अशा पद्धतीने दुचाकी खरेदी करून त्यांची विक्री अमरावतीत मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे नागपुरातील गणेशपेठ ठाण्याचे पोलिस पथक शुक्रवारी (दि. ६) शहरात आले होते. त्या पथकाने शहरातून पाच नव्याकोऱ्या दुचाकी जप्त केल्या आहे. याव्यतिरीक्त अमरावती शहरात अशा शेकडो दुचाकी असल्याचे नागपूर पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.
नागपूरातील गणेशपेठ पोलिसांनी ४ जुलैला वाहन चोरी प्रकरणात नागपूरातीलच सलमान रहमान शहा (२४ रा. लोधीपुरा), शेख इनाम शेख इक्राम (२१,रा. गांधीबाग) आणि मजहर खान महमूद खान (२३, रा. नवाबपुरा) यांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी नागपुरातच पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच पोलिसांच्या तपासात या तिघांचा अमरावतीच्या दोघांसोबत वाहन व्यवसायातून संपर्क आल्याचे पुढे आले आहे. त्यामुळेच नागपूर पोलिस शुक्रवारी शेख इनामला घेवून रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या अमरावतीतील दोघांच्या शोधासाठी आले होते मात्र नागपूर पोलिस शहरात पोहोचण्यापूर्वीच ते दोघेही शहरातून पसार झाले आहे. नागपूरात पोलिसांनी अटक केलेल्या तिघांसोबतच शहरातील दोघे तसेच नागपूरातील अन्य काही जणांनी संगनमताने बनावट किंवा खोट्या कागदपत्राच्या आधारे नविन दुचाकी विकत घेवून ती कमी किमतीत विक्री करण्याचा गोरखधंदा मागील दिड ते दोन वर्षांपासून सुरू केला आहे. अशा शेकडो दुचाकी या रॅकेटने नागपूरातून खरेदी करून शहरात विक्री केल्याचे तपासात पुढे आले आहे. या दुचाकी शहरात कोणाकडे आहेत, अशा काही व्यक्तींची नावे नागपूर पोलिसांना माहीत झाले होते. त्या आधारे पोलिस पथकाने शुक्रवारी चार जणांकडून पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. यामध्ये चार अॅक्टिव्हा व एका डीओ दुचाकीचा समावेश आहे. या व्यतिरिक्तही या रॅकेटव्दारे विक्री केलेल्या शहरात एम. एच. ४०, एम. एच. ४९ आणि एम. एच. ३१ सिरीजच्या तसेच काही विनाक्रमांक नव्याकोऱ्या दुचाकी शहरातील रस्त्यांवर असल्याची खात्रीलायक माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे. नागपूरवरून शहरात आलेल्या पथकात गणेशपेठ ठाण्याचे उपनिरीक्षक अमितकुमार आत्राम, हेड कॉन्सटेबल आनंद वानखेडे, शरद चांभारे, अजय गिरळकर आणि चंदू ठाकरे यांचा समावेश होता.
शहरातील पोलिसानेही काही दिवस जप्त केलेल्या पाचपैकी एक दुचाकी वापरली
पोलिसांनी शुक्रवारी जप्त केलेल्या पाच दुचाकीपैकी चार दुचाकी नागपूरी गेट ठाण्याच्या हद्दीतून तर एक बडनेरामधून जप्त केली आहे. विशेष म्हणजे या पाचपैकी एक दुचाकी शहर पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस हवालदाराच्या नातेवाईकाकडे होती. ही दुचाकी अनेक दिवस त्या पोलिस कर्मचाऱ्याने वापरली होती. इतकेच नाही तर या पांढऱ्या रंगाच्या अॅक्टिव्हावर 'पोलिस' असे लिहिले होते. मात्र पोलिसांनी दुचाकी जप्त करताच त्या दुचाकीवरून पोलिस खोडण्यात आले आहे. या प्रकरणाची चर्चा संपूर्ण पोलिस वर्तुळात सुरू होती. या प्रकरणात त्या पोलिस कर्मचाऱ्याचीही चौकशी होण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
आम्हीही केली तपासणी मोहीम सुरू
नागपूर पोलिसांचे पथक शुक्रवारी आले होते. पाच दुचाकी जप्त करून घेऊन गेले आहेत. शहरात अजूनही शेकडो दुचाकी असल्याचा संशय नागपूर पाोलिसांनी व्यक्त केल्यामुळे आम्ही दुचाकींची तपासणी मोहीम सुरू केली आहे. या प्रकाराबाबत वरिष्ठांनासुद्धा आम्ही माहिती देणार आहे.
- दिलीप चव्हाण, ठाणेदार नागपूरी, गेट.
चौघांना नोटीस देऊन चौकशीसाठी बोलवले
बनावट े कागदपत्र वापरून नागपूरातून खरेदी केलेल्या दुचाकीअमरावतीमध्ये या रॅकेटद्वारे विक्री केलेल्या शेकडो दुचाकी असल्याची माहिती समोर आली आहे. या रॅकेटमध्ये सहभागी शहरातील दोघांचा आम्हाला शोध आहे रॅकेटव्दारे शहरात आलेल्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यापैकी दोन दुचाकी एकाकडे होत्या. या दुचाकी वापरणाऱ्या चौघांना नोटीस देवून ९ जुलैला चौकशीसाठी नागपूरला बोलवले आहे.
- अमीतकुमार आत्राम, पीएसआय, गणेशपेठ, नागपूर.
अशा पद्धतीने खरेदी करून विक्री करायचे दुचाकी
या रॅकेटमधील ठकबाजांनी अनेक दुचाकी खरेदी करताना बनावट कागदपत्र वापरले आहे. या कागदपत्रांच्या आधारे खासगी फायनान्स कंपनीकडे जायचे. या रॅकेटला संबंधित फायनान्स कंपनीचे काही एजन्टही मदत करायचे. दहा ते बारा हजार 'डाऊन पेमेन्ट'मध्ये नवीन वाहन यांना शोरुममधून मिळायचे. या सर्व प्रक्रियेत पंधरा हजार रुपयात नवीन वाहन शोरुममधून बाहेर यायचे व रॅकेटच्या हातात मिळायचे. विशेष म्हणजे या वाहनांची आरटीओकडेही नोंदणी करण्यात यायची. त्यानंतर फायनान्स कंपनीची एक किंवा जास्तीत जास्त दोन 'इएमआय' भरणा करायची. त्यानंतर मात्र संबंधित दुचाकी ३५ ते ४० हजार रुपयात अमरावतीमध्ये विक्री करायची. ही दुचाकी विक्री करताना शहरातील दुचाकी घेणाऱ्याला स्टॅम्प पेपरवर लेखी द्यायचे. तसेच बनावट नावाचे ओरिजनल कागदपत्र सुद्धा वाहनासोबत असायचे. शोरुममध्ये नवीनकोरी दुचाकी ७० ते ७५ हजारात आहे, ती या रॅकेटकडून खरेदी केल्यानंतर ३५ ते ४० हजार रुपयात मिळायची.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.