आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बीएसएनएल'चा मुख्य केबल डक्ट तुटला; सेवा विस्कळीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - सद्या शहरात अनेक मार्गाचे काँक्रिटीकरण सुरू आहे. याच दरम्यान चौधरी चौकात काँक्रिटीकरणाच्या कामापूर्वी एका नालीची भिंत बांधण्यासाठी साबांविने जेसीबीद्वारे खोदकाम सुरू केले होते. याच कामादरम्यान जेसीबीद्वारे जमिनीखाली असलेला 'बीएसएनएल'चा संपूर्ण जिल्ह्याचा मुख्य केबल डक्टच उखळल्या गेला आहे. त्यामुळे डक्टचे अनेक केबल तुटले व शहरातील मोबाइल सेवेसह संपूर्ण जिल्ह्यातील 'बीएसएनएल'ची सेवा शनिवारी दिवसभर विस्कळीत झाली होती. 'बीएसएनएल'ने युद्धपातळीवर सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, शनिवारी (दि. ९) रात्रीपर्यंत अनेक सेवा सुरू केल्या होत्या. या प्रकारामुळे साबांवि आणि 'बीएसएनएल' समोरासमोर आले असून या प्रकरणात 'बीएसएनएल'कडून साबांविविरुद्ध पोलिस तक्रार करण्याची प्रक्रिया शनिवारी रात्री सुरू होती.

 

चौधरी चौकात शुक्रवारी (दि. ८)रात्रीपासून साबांविने काम सुरू केले आहे. कारण साबांविला प्रत्येक रस्त्याच्या कामासाठी वळेचे बंधन घालून दिले आहे. रस्त्याच्या कामासोबतच त्यांना रस्त्यावरील पाणी आजूबाजूला राहणाऱ्या नागरीकांच्या प्रतिष्ठाणांमध्ये किंवा घरांमध्ये जावू नये म्हणून नालीचेही काम करणे आवश्यक आहे. दरम्यान चौधरी चौकातील नालीवर स्लॅब टाकण्यासाठी सदर नालीचे खोदकाम सुरू केले. त्यावेळी या खोदकामात 'बीएसएनएल'चा मुख्य केबल डक्ट उखडल्या गेला आहे. या डक्टमधून संपुर्ण जिल्ह्यातील चौदा तालुक्याचा दूरध्वनी पुरवठा तसेच मोबाईल टॉवरला पुरवठा झालेला आहे. इतकेच नाही तर यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांनाही पुरवठा करणारे कनेक्शन्स असल्यामुळे शनिवारी सकाळी संपूर्ण 'बीएसएनएल' सेवा विस्कळीत झाली होती.


कारण जेसीबीव्दारा उखडण्यात आलेला लाँग डिस्टन्स 'ओएफसी' केबल डक्ट होता. या संदर्भात 'बीएसएनएल'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमचा अतिशय महत्वाचा तो डक्ट होता. काम करण्यापूर्वी या डक्टचे इतरत्र शिफ्टींग करणे शक्य नव्हते. यामुळे आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आमच्या ग्राहकांनाही फटका बसला आहे. हा डक्ट तुटल्यामुळे शहरातील अनेक मोबाइल टॉवर, हजारो लॅन्डलाईन कनेक्शन्स तसेच चौदाही तालुके शनिवारी दिवसभर बंद होते. सदर डक्टचे बांधकाम हे २० वर्षांपूर्वी झालेले आहे. शनिवारी किंवा शुक्रवारी आम्ही त्या ठिकाणी काम करणार अशी कुठलीही माहिती साबांविने आम्हाला न देता हा डक्ट तोडला, असा आरोप 'बीएसएनएल'च्या अधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणी 'बीएसएनएल'चे उप महाप्रबंधक प्रमोद धोबे हे साबांविविरुद्ध तक्रार देण्यासाठी शनिवारी सायंकाळी कोतवाली ठाण्यात पोहोचले होते. शनिवारी रात्रीपर्यंत तक्रार नोंदवण्याचे काम सुरू होते. दरम्यान, या प्रकारामुळे शनिवारी दुपारी चौधरी चौकात 'बीएसएनएल' तसेच साबांविचे वरिष्ठ अधिकाऱ्यापासून दोन्ही विभागाचे मोठ्या प्रमाणात कर्मचारी, अधिकारी हजर होते. परिस्थिती काहीशी चिघळल्यामुळे कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटील आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर दान्ही विभागाचे अधिकारी पोलिस ठाण्यात पोहचले होते.

 

दोन हजारांवर लॅन्डलाईन सुरू करण्यासाठी दहा ते बारा दिवस लागणार
हा डक्ट तुटल्यामुळे शहरात असलेल्या 'बीएसएनएल'च्या दीडशे मोबाइल टॉवरपैकी ३५ टॉवर अजूनही बंद आहेत. तसेच विलासनगर, शेगाव नाका, रामपुरी कॅम्प व परिसरातील दोन हजारांवर लॅन्डलाईन कनेक्शन बंद आहेत. ही सेवा पुर्ववत करण्यासाठी किमान दहा ते बारा दिवस लागणार आहे. शनिवारी दिवसभर जिल्ह्यातील चौदाही तालुक्यातील सेवा विस्कळीत झाली होती मात्र आम्ही युद्धपातळीवर काम सुरू करून लवकरात लवकर सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न करतो आहे. सदर डक्ट तुटल्यामुळे 'बीएसएनएल'चे जवळपास ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती 'बीएसएनएल'चे सहायक महाप्रबंधक संतोष गांधी यांनी ' दिव्य मराठी'शी बोलताना दिली.

 

आतापर्यंत आठ ते दहा पत्रांव्दारे दिली होती माहिती : या भागात 'बीएसएनएल'चा डक्ट असल्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून 'बीएसएनएल'सोबत आम्ही सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. जवळपास आठ ते दहा पत्र दिलेत मात्र 'बीएसएनएल'कडून आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. आम्ही हेतूपुरस्सरपणे तो डक्ट तोडलेला नाही. दरम्यान आम्ही 'बीएसएनएल'सोबत पत्रव्यवहार, बैठकांमधील प्रोसेडींग पोलिसात सादर करणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे यांनी दिली.

 

तक्रारीवरून गुन्हा दाखल होणार
सार्वजनिक बांधकाम विभागाचे खोदकाम सुरू असताना 'बीएसएनएल'चा डक्ट तुटलेला आहे. आम्ही घटनास्थळी जावून आलोत. या प्रकरणात 'बीएसएनएल'चे अधिकारी तक्रार देत आहेत, ती नाेंदवण्याचे काम सुरू आहे. तक्रारीवरून संबधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. - - दिलीप पाटील, ठाणेदार कोतवाली.

 

बातम्या आणखी आहेत...