आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्करोग दिन विशेष: दर हजारी 12 महिला, 5 टक्के पुरुषांना कर्करोग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - दर हजार महिलांमागे १० ते १२ महिलांना स्तन व गर्भाशयाचा कर्करोग होत असून ५ टक्के पुरुषांना तोंड व अन्ननलिकेचा कर्करोग विळखा घालत आहे. स्त्रियांमध्ये बदलती जीवनशैली हे त्यामागचे कारण असून पुरुषांमध्ये धूम्रपान हे कर्करोगाचे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.


रविवारी ४ जानेवारीला जागतिक कर्करोग दिवस आहे. त्यानिमित्त दैनिक दिव्य मराठीने कर्करोगाची व्याप्ती आणि त्याची कारणे शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांकडून जाणून घेतली असता, वरील धक्कादायक तथ्य समोर आले.

 

महिलांमध्ये आढळणारे कर्करोग, त्याची प्रमुख कारणे : स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगामध्ये स्तनाच्या कर्करोगानंतर गर्भाशयाच्या कर्करोगाचा क्रमांक लागतो. कर्करोगाचे निदान होत असल्याने महिलांमध्ये त्याचे प्रमाण कमी झाले असले, तरी शहरात महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. त्याला स्तनपान न करणे, असंतुलित आहार, आरोग्याकडे दुर्लक्ष करणे, कामाचा अतिरिक्त ताण ही कारणे आहेत. गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण ग्रामीण स्त्रियांमध्ये अधिक असून हार्माेन्समधील असंतुलितपणा, एचपीव्हीचा प्रादुर्भाव, मासिक पाळीतील अनियमितता, गुप्तांगाची अस्वच्छता, ही कारणे असल्याची माहिती कर्करोग तज्ञ्ज व कॅन्सर फाउंडेशनचे डायरेक्टर डॉ. राजेंद्र अरोरा व डॉ. सुमेधा पांढरीकर, येथील डॉ. बी. आर. देशमुख यांनी दिली.   


पुरुषांमध्ये होणारे प्रमुख कर्करोग व त्याची कारणे
पुरुषांमध्ये दर हजारी पाच पुरुषांना तोंडाचा, अन्ननलिकेचा व त्यानंतर फुफ्फुसाच्या कर्करोगाचा विळखा बसतो. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हे त्याचे मुख्य कारण आहे. तोंडात येणारी गाठ व न भरणारी जखम हे त्याचे प्रमुख लक्षण असल्याची माहिती डाॅ. अरोरा यांनी दिली.

 

वर्षातून एकदा महिलांनी आरोग्य तपासणी करावी
महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगासाठी रक्ताच्या नात्यात कुणाला असलेला कर्करोग हेही एक कारण आहे. त्यासाठी युवती व महिलांनी वेळोवेळी स्वत: परीक्षण करावे. याशिवाय वयाच्या ३५ वर्षांनंतर वर्षातून एकदा तरी कर्करोगाशी संबंधित चाचणी करावी.
- डॉ. सुमेधा पांढरीकर, अध्यक्ष, स्त्री रोग प्रसूतीशास्त्र संघटना

 

निदानाअंती उपचाराने फायदा
कर्करोग हा प्राथमिक टप्प्यामध्ये असल्याचे निदान झाल्यानंतर तो उपचार केल्यामुळे पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे कर्करोगाने होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करता येणे शक्य आहे. त्यामुळे पुरुषांनी कर्करोग न होण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन टाळण्याची आवश्यकता आहेे.
- डाॅ. राजेंद्र अरोरा, कर्करोग तज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...