आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता वर्धेकर निवडणार आपला 'शहरपक्षी', ऑनलाईन व्हाेटिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय नीलपंख - Divya Marathi
भारतीय नीलपंख

नागपूर- विदर्भातील पहिली आणि महाराष्ट्रात दुसरी ठरणाऱ्या वर्धा शहरपक्षी निवडणुकीचा प्रारंभ उद्या शनिवार, २३ पासून होत आहे. बहार नेचर फाउंडेशन व नगरपरिषद, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने या निवडणुकीचे आयोजन करण्यात आले असून निवडणूक रिंगणात पाच पक्षी उमेदवार आहेत. निवडणूक मुख्यत्वे ऑन लाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. 


वर्धानगरीचा शहरपक्षी (सिटी बर्ड ) निश्चित करण्यासाठी पाच पक्ष्यांमधून निवडून आलेल्या पक्ष्याला शहरपक्षी घोषित केले जाणार आहे. अश्या प्रकारची पक्ष्यांची निवडणूक कोकणातील सावंतवाडी येथे पहिल्यांदा २०१७ मध्ये घेण्यात आली होती. वर्धा शहरपक्षी निवडणूक ही महाराष्ट्रातील दुसरी व विदर्भातील पहिलीच निवडणूक ठरणार आहे. वर्धा नगरवासीयांना पक्षीजिवनाची ओळख व्हावी, शहराची पक्षीप्रेमी व पर्यावरणस्नेही ही ओळख निर्माण व्हावी, या उद्देशाने या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 


या निवडणुकीकरिता वर्धा शहर परिसरात आढळणारे तांबट, पांढऱ्या छातीचा धीवर, ठिपकेवाला पिंगळा, भारतीय निलपंख आणि कापशी घार असे पाच पक्षी उमेदवार ठरविण्यात आले आहेत. या पाच पक्ष्यांमधून ऑन लाईन पद्धतीने शहरपक्षी निवडायचा आहे. त्यासाठी एक गुगल लिंक उपलब्ध करून दिल्या जाईल. या लिंकवर क्लिक केल्यास पाच पक्षी उमेदवारांची नावे असलेली मतपत्रिका उपलब्ध होईल. त्यातील पाचपैकी एका पक्षाला मतदान करून स्वत:चे नाव व गाव लिहून ही मतपत्रिका पुन्हा सबमिट करावयाची आहे. याशिवाय, शहरातील नगर परिषद कार्यालय, बहार कार्यालय, "डिझायनो' जेल रोड, महावीर उद्यान, बजाज वाचनालय येथे मतदान केंद्र (बूथ) राहिल व तेथे छापील मतपत्रिकेद्वारे मतदान करता येईल. तसेच, एका फिरत्या मतदान केंद्राचाही वापर या काळात करण्यात येईल. निवडणूक कालावधी २३ जून ते १५ ऑगस्ट राहणार असून सर्व वयोगटातील शहर वासीयांना मतदान करता येईल. १९ ऑगस्टला निकाल जाहीर करण्यात येईल. मतदान जागृतीकरिता तसेच शाळा कॉलेजमधील युवकांपर्यंत पोचण्याकरिता बहार नेचर फाऊंडेशन प्रयत्न करणार आहे. निवडणूक निरीक्षक म्हणून निसर्ग अभ्यासक डॉ. तारक काटे, डॉ. गोपाल पालीवाल व प्रा. अतुल शर्मा काम पाहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...