आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपजवळ \'मॅन टू मॅन\'अन् \'हार्ट टू हार्ट\' जाणारी माणसे, मुख्यमंत्र्यांनी दिला संवादाचा कानमंत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- चुकीच्या वावड्या कितीही उठल्या तरी भाजपजवळ 'मॅन टू मॅन', 'हार्ट टू हार्ट' जाणारी माणसे अाहे. सरकारच्या योजनांचे लाभार्थी तसेच नागरिकांसोबत प्रत्येक बूथच्या माध्यमातून संवाद साधा, असा कानमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या पश्चिम विदर्भ पदाधिकारी बैठकीत शनिवारी (१४ जुलै) मुख्यमंत्री बाेलत होते.

 

पक्षाने बूथ स्तरावर संघटन मजबूत केल्याने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत देशातील १४ कोटी लोकांची मते मिळाल्याने बहुमताने सरकार आले. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थींची संख्या २४ काेटी आहे. योजनांच्या लाभार्थींची संख्या ४० ते ४५ कोटींवर जाणार आहे. यातील ५० टक्के लोकांनी जरी मते दिली, तरी केंद्रात भाजपचे सरकार येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकींच्या अनुषंगाने बूथ निहाय संघटन मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला. पदाधिकारी नागरिक-लाभार्थींपर्यंत जाताहेत किंवा नाही याचा आढावा घेण्याकरिता निर्णयानंतर पहिला मेळावा पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांचा होत आहे.

 

एकीकडे देश मंगळावर उपग्रह सोडत आहे तर दुसरीकडे देशातील ६० लाख कुटुंबांकडे शौचालय नाही. ६७ वर्षात ज्यांनी केले नाही ते भाजप सरकारने तीन वर्षात करुन दाखविले. देशात ४० ते ४५ टक्के लाेकांकडे स्वत:चे घर नाही. २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याची योजना हाती घेण्यात आली. ५ कोटी कुटुंबांना गॅस सिलिंडर, १८ हजार गावात विजेचे कनेक्शन अश्या प्रकारे परिवर्तनाचा मोठा प्रयत्न सरकारने केला. शेतमालाला हमीभाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. स्वामीनाथन आयोग २००५ मध्ये आला. २००५ ते २०१४ पर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते, तर शरद पवार देशाचे कृषिमंत्री होते. मात्र त्यावेळेस कोणी अवाक्षर काढले नाही, आंदोलने केली नाही.


भाजप सरकारने अभूतपूर्व वाढ हमी भावात केल्याने लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. पूर्वीच्या सरकारने पूर्ण विदर्भाला २०० ते २५० कोटींची कर्जमाफी दिली तर भाजप सरकारने एका जिल्ह्याला २०० ते २५० कोटींची कर्जमाफी दिली. मुख्यमंत्री सडक योजनेतून ३० हजार कि.मी., १० हजार राज्य मार्ग तर केंद्राच्या निधीतून १५ हजार कि.मी. चे राज्यात रस्ते होणार आहे. भाजपचा कार्यकर्ता संवेदनशील असून ही संवेदनशीलता कायम ठेवत प्रत्येक नागरिकांशी संवाद साधत सरकारच्या योजनांची माहिती पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री प्रवीण पोटे, महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक, भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. रामदास आंबटकर, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे, वर्ध्याचे खासदार रामदास तडस, ज्येष्ठ नेते अरुण अडसड, विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष आमदार चैनसुख संचेती, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार डॉ. सुनील देशमुख, महापौर संजय नरवणे, आमदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रमेश बुंदिले, आमदार प्रभुदास भिलावेकर, शहराध्यक्ष जयंत डेहनकर, जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सूर्यवंशी उपस्थित होते.

 

देशात एकूण ४०० पक्ष
देशात ४०० पेक्षा अधिक पक्ष आहेत. त्यात गांधी, यादव, पवार असे कुटुंबांचे पक्ष आहेत, मात्र भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्ता हा पक्षाला उत्तरदायी अाहे. सामाजिक, आर्थिक,राजकीय परिवर्तनासाठी स्वयंप्रेरणेने काम करणारे कार्यकर्ते भाजपात आहेत. म्हणून एक टोकाचे परिवर्तनाचे कार्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

 

 

बातम्या आणखी आहेत...