आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून शासनाच्या 'त्या' अन्यायकारक आदेशाची होळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ९ फेब्रु. २०१८ रोजी अध्यादेश काढून राज्यातील तीन लाखाहून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भवितव्याबाबत घेतलेल्या अन्यायकारक निर्णयाचा निषेध म्हणून शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवार २१ फेब्रुवारी. रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आदेशाची होळी करण्यात आली.


कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीतील अटी व शर्तींबाबत तसेच सेवा नियमित न करण्याबद्दल सामान्य प्रशासन विभागाने अध्यादेश काढला. यात सरळ कर्मचाऱ्यांना नियमित करण्याच्या आदेशात अडचणी येऊ शकतात, असे म्हटले आहे. त्यामुळे राज्यभरातील अमरावती जिल्ह्यासह राज्यभरातील तीन लाख कर्मचाऱ्यांमध्ये शासनाबद्दल असंतोष खदखदत असून त्याची परिणती आजच्या निषेध मोर्चात झाली. हा अन्यायकारक निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. जिल्हाधिकारी शहरात नसल्यामुळे जोवर ते येत नाहीत तोवर आम्ही थांबण्यास तयार आहोत. त्यांना आमची व्यथा ऐकावीच लागेल, असा आग्रहही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी धरला होता.

 

इर्विन चौक येथून दु. १२ च्या सुमारास डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून माेर्चा काढण्यात आला. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कंत्राटी कर्मचारी हाती फलक घेत मूकपणे चालत राहिले. जिल्ह्यातील विविध विभागात मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यांचे भवितव्य शासनाच्या या निर्णयामुळे धोक्यात आले आहे. हे कर्मचारी १९९५-९६ पासून शासनाची विविध कामे करीत आहेत. ज्या ज्या विभागात कर्मचाऱ्यांचा अनुशेष आहे तेथे हे कर्मचारी सेवा देत शासनाला मदतच करीत असतात. आजवर दर १२ महिन्यांनी शासन त्यांच्याशी कंत्राटी नोकरीचा करार करून घेत होते. मात्र नवा अध्यादेश निघाल्यामुळे यापुढे नेहमीप्रमाणे कराराचे नूतनीकरण होणार नाही, असा धोका वाटत असल्यामुळेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर यावे लागले. या वेळी विविध संघटनांचे प्रशांत जोशी, विवेक राऊत, रविराज बोनडे, नीलकंठ ठवळी, प्रमोद मिसाळ, श्याम देशमुख, प्रकाश आंबेकर, किशोर बागवान, रूपेश धंदर, राजेश बहाळ, विजय अनादाने, चंद्रकांत हिरोळे, सुनील वरघट, राजू दुबे, संदीप खडसे, पंकज रहाते, शेग आसिफ यांच्यासह संघटनांचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. या मोर्चात शेकडोच्या संख्येत कर्मचारी सहभागी झाले. ते दोन-दोनच्या रांगेत पुढे सरकत होते. शासनाच्या विविध कार्यालयांसह वैद्यकीय सेवा व इतर विभागातील कर्मचारी या मोर्चात सहभागी झाल्यामुळे संबंधित विभागातील सेवा ढासळली होती.

 

विविध संघटनांचा एकत्रित मोर्चा : एनआरएचएम संघटना, सर्वशिक्षा अभियान, क्षयरोग संघटना, आयटीआय संघटना, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, एड्स नियंत्रण कर्मचारी संघटना, मग्रारोहयो कृती समिती, जिल्हा नर्सेस संघटना, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, एमआरजीएस संघटनेसह इतर कंत्राटी संघटनांनी या निषेध मोर्चात सहभाग नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...