आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञान विस्तार; पीक प्रात्याक्षिक आता शंभरवरून दहा हेक्टरवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शेतकऱ्यांसोबत संवाद वाढवण्यासाठी व तंत्रज्ञानाचा प्रसार होऊन उत्पादकता वाढवण्यासाठी पिक प्रात्याक्षिकाचे क्षेत्र शंभरवरून दहा हेक्टरवर घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. त्यामुळे कृषी सहायकांवरील मोठा ताण कमी होणार असून आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. 


शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या शेतावर पिक प्रात्याक्षिके घेण्यात येतात. परंतु, आतापर्यंत एका कृषी सहायकावर पिक प्रात्याक्षिकांची सुमारे शंभर हेक्टरची जबाबदारी होती. त्यामुळे विखुरलेल्या मोठ्या क्षेत्रावर पोहोचून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे कृषी सहायकांना शक्य होत नसे. शेतकऱ्यांसोबत संवादच साधला जात नसल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास कमालीच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन आदी मार्गदर्शन शेतकऱ्यांना व्यवस्थित व्हावे या उद्देशाने शासनाने पिक प्रात्याक्षिकांची मर्यादा शंभर हेक्टरवरून दहा हेक्टरवर आणली आहे. याबाबतचे आदेश शासनाने कृषी विभागाला बजावले आहेत. त्यामुळे कृषी सहायकांचा मोठा ताण हलका होण्यास मदत होणार आहे. प्रत्येक गावात ज्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असेल त्या योजनेअंतर्गंत पिक प्रात्याक्षिकांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कृषी सहायकांची राहणार आहे. एका हंगामात प्रत्येक कृषी सहायकाकडे साधारणत: दोन व खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामात मिळून कमाल पाच पिक प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्याची जबाबदारी कृषी सहायकावर टाकली आहे. 


या क्षेत्रावर कृषी पर्यवेक्षकांनी दर पंधरा दिवसाला पिक प्रात्याक्षिकाला नियमित भेटी देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे लागणार आहे. यासोबतच पुढील पंधरा दिवसाचे नियोजन करून कृषी सहायकाला मार्गदर्शन करावे लागणार आहे. त्यानंतर कामाचे मूल्यमापन करून अहवाल वरिष्ठ कार्यालयास नियमित सादर करावा लागणार आहे. प्रात्याक्षिकांना भेट दिल्यानंतर कृषी पर्यवेक्षकांना विविध योजनाअंतर्गंत नेमून दिलेल्या बाबींची संबंधित गावात मोका तपासणीही करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक मंडळ कृषी अधिकाऱ्यांना पंधरा दिवसांतून एकदा किमान एका प्रात्याक्षिकांस भेट देऊन आपला अहवाल वरिष्ठांना सादर करावा लागेल. खरीप व रब्बी हंगामामध्ये जूनपासून पुढील प्रत्येक महिन्यांच्या ३० पर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांना शासनाला अहवाल सादर करावा लागणार आहे. 


एक एकरापर्यंत शेतकऱ्यांना मिळणार लाभ 
पिक प्रात्याक्षिक योजनेअंर्तंत दहा शेतकऱ्यांच्या समुहाला प्रत्येकी एक एकराच्या प्रात्याक्षिकाचा लाभ मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. गावात प्रात्याक्षिकांच्या संख्येपेक्षा अधिक गट इच्छुक असल्यास लाभार्थी गटाची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना एक एकराच्या मर्यादेतच आर्थिक लाभ मिळणार आहे. 


विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचेही घ्यावे लागणार मार्गदर्शन 
तालुक्यातील प्रमुख पिकांची सरासरी उत्पादकता, काही शेतकऱ्यांनी स्वकष्टाने या संबंधित पिकांमध्ये मिळवलेली उच्चतम उत्पादकता आणि त्या पिकांची विद्यापीठाने ठरवून दिलेल्या अनुवांशिक उत्पादन क्षमतेत मोठा तफावत आढळून आली आहे. ही तफावत कमी करून उत्पादकता वाढवण्यासाठी स्थानिक कृषी हवामान पद्धतीचा विचार करून संबंधित कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख पिकांसाठी कृषी विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख पिकांसाठी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञान निश्चित करून कृषी विभागीय सहसंचालकांना द्यावे लागणार आहे. तंत्रज्ञान निश्चितीसाठी संबंधित पिकांचे उच्चतम उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांची मदत घेण्याचेही निर्देश शासनाने दिले. 


पिक कापणी जबाबदारी 
पिक कापणी प्रयोगाची जबाबदारी कृषी सहायक व पर्यवेक्षकांवर टाकली आहे. या दोन्ही घटकांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी तालुका कृषी अधिकाऱ्यांची असून उत्पादकतेचा अहवाल कापणीनंतर पंधरा दिवसांत वरिष्ठ कार्यालयाला सादर करावा लागणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...