आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइलचे 'आयएमईआय' क्रमांक बदलवून देणाऱ्याला सायबर पोलिसांनी पकडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- प्रत्येक मोबाइल हॅन्डसेटला स्वतंत्र ओळख असावी म्हणून एक युनिक आयडी असतो. याच क्रमांकाला 'आयएमईआय' (इंटरनॅशनल मोबाईल इक्पीपमेंट आयडेन्टी) क्रमांक म्हणतात. हा क्रमांक एका मोबाइलला जगात एकच राहतो. दरम्यान, मोबाइल चोरी गेल्यानंतर याच क्रमांकाच्या आधारे पोलिस मोबाईलचा शोध घेवू शकतात. मात्र शहरातील राजकमल चौकात कौसल्या मोबाइल रिपेरिंग या दुकानात कोणत्याही मोबाइलचा 'आयएमईआय'क्रमांक बदलवून मिळत होता. ही माहिती सायबर ठाण्याच्या पोलिसांना मिळताच पोलिसांनी दुकानावर धाड टाकून हा गोरखधंदा करणाऱ्याला सोमवारी (दि. ११) अटक केली आहे. अशा प्रकारची शहरात झालेली ही पहिलीच कारवाई आहे. 


संघराज संपतराव डोंगरे (२८, लढ्ढा प्लॉट, नवीवस्ती, बडनेरा) याला पोलिसांनी अटक केली आहे. संघराज डोंगरेचे राजकमल चौकात मोबाइल रिपेरिंगचे दुकान आहे. या ठिकाणी संघराज कोणत्याही मोबाइल हॅन्डसेटचा 'आयएमईआय' क्रमांक बदलवून देत असल्याची माहिती सायबर ठाण्याचे एपीआय कांचन पांडे यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी एका व्यक्तीला 'डमी' ग्राहक बनवून ७ जूनला त्याच्याकडे पाठवले होते. त्या डमी ग्राहकाकडून डोंगरेने एक हजार रुपये घेवून सोमवारी हा हॅन्डसेटचा 'आयएमईआय' क्रमांक बदलवून दिला. त्यामुळे पोलिसांना खात्री पटली व त्यानंतर सायबर पोलिसांनी त्याच्या दुकानावर धाड टाकली. 'आयएमईआय' क्रमांक बदलवण्यासाठी तो एका सॉफ्टवेअरचा वापर करत होता. पोलिसांनी ते सॉफ्टवेअर व अन्य साहित्य जप्त केले आहे. संघराज मागील एक वर्षांपासून मोबाइलचे 'आयएमईआय' क्रमांक बदलवून देण्याचे काम करतो. त्यामुळे आजवर त्याने कित्येक मोबाइलचे 'आयएमईआय' क्रमांक बदलवून दिले असेल, याबाबत पोलिस माहिती घेत आहेत. हा प्रकार माहिती तंत्रज्ञान कायदान्वये गुन्हा असल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. मोबाइलचे 'आयएमईआय' क्रमांक बदलवून देण्याचा हा प्रकार पुढे आले आहे. ही कारवाई सायबर ठाण्याचे एपीआय पांडे, जगदीश पाली, तोहर अली, सचिन भोयर, मयूर बोरकर, पंकज गाडे, जाकीर यांनी केली आहे. 


इंटरनेटवरून माहिती घेऊन शिकला 
संघराजने मोबाइल सॉफ्टवेअर संदर्भात कोणतेही वेगळे शिक्षण घेतले नाही. त्याचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्याने इंटरनेटवरील माहितीच्या आधारे मोबाईल हॅन्डसेटचा 'आयएमईआय' क्रमांक बदलवण्याचे काम केले आहे. या प्रकरणात आम्ही सखोल तपास करत आहोत.

- कांचन पांडे, एपीआय, सायबर सेल. 

बातम्या आणखी आहेत...