आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमरावती- पर्यावरण रक्षणासह रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करणे तसेच आरोग्यदायी सायकल चालविण्यासाठी सर्वसामान्यांना प्रोत्साहीत करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने अमरावती शहरात पहिले माॅडेल सायकल ट्रॅक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर राज्यातील १० शहरांमध्ये अशाचप्रकारे सायकल ट्रॅक उभारले जातील, त्यालाही शासनाने तत्वत: मान्यता दिल्याची माहिती स्ट्रीट विथ सायकल ट्रॅक, राज्यस्तरीय समितीचे सदस्य अन् मिशन आॅलिम्पिक्सचे अध्यक्ष दिपक आत्राम यांनी दिली.
मिशन आॅलिम्पिक्सद्वारे १९ डिसेंबर २०१६ रोजी नागपूर-मुंबई सायकल यात्रेच्या अंतिम चरणात मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशीही यात्रेत सहभागी झाले होते. त्यांनीच मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत अमरावतीसह राज्यातील १० शहरांमध्ये सायकल ट्रॅकला मंजुरी देण्यात आली. सायकलस्वारांसाठी सुरक्षित अशा ट्रॅकची परदेशी यांच्या पुढाकाराने अमरावतीत निर्मिती होणार आहे.
इर्विन चौक ते पंचवटी हा ८०० मीटरचा ट्रॅक रस्त्याच्या डावीकडे उभारला जाणार आहे. तो माॅडेल ट्रॅक असेल. या रस्त्यावर बहुतेक शाळा-महाविद्यालये अधिक असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्याही जास्त आहे. हा ट्रॅक सिमेंट रोडवरच डाव्या बाजूने तयार केला जाणार आहे. यामुळे पादचाऱ्यांसाठी फुटपाथही कायम राहतील. तसेच जेथे शाळा, महाविद्यालय व कार्यालयांचे द्वार आहे तेथे हा ट्रॅक जाण्या-येण्यास अडथळा नको म्हणून खुला ठेवला जाईल. सायकल ट्रॅकच्या निर्मितीसाठी शासनाद्वारे गठित स्ट्रीट विथ सायकल ट्रॅक चार सदस्यीय राज्यस्तरीय समितीत रस्ते सचिव, अतिरिक्त वाहतूक संचालक आणि मिशन आॅलिम्पिक्सच्या मुंबई व अमरावती येथील दोन सदस्यांचा समावेश आहे.
असे असेल ट्रॅकचे स्वरूप
शहरातील २२ कि.मी.लांबीचे हे ट्रॅक रस्त्याच्या डाव्या बाजुला असतील. हा बॅरिकेटेड ट्रॅक डिव्हायडर लावून दोन लेनचा तसेच ३.५ मी. रुंदीचा तयार केला जाणार असल्याने सायकलपटूंसाठी सुरक्षित असेल. ट्रॅकच्या पृष्ठभागावर सायकलचे थर्मोप्लास्टीक पेंटने अंकित बोधचिन्ह असेल. संपूर्ण ट्रॅकवर सिंथेटिक रबरचे ५ ते १० एम.एम.आवरण असेल.
सायकलस्वाराला ऊन, वारा, पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून त्यावर फॅब्रिक कव्हर राहणार आहे. तसेच सायकलपटूंना अंधाराचे अडचण होऊ नये यासाठी एलईडी लाईट्स आत बसविले जातील. त्यामुळे ट्रॅक प्रकाशित होऊन त्याचे सौंदर्यिकरणही होईल.
या भागात असतील सायकल ट्रॅक
राजापेठ चौक ते बडनेरा ८ कि.मी., राजापेठ चौक ते दस्तुरनगर ४ कि.मी., इर्विन चौक ते कठोरा नाका ४ कि.मी., इर्विन चौक ते तपोवन ४ कि.मी., पंचवटी चौक ते वेलकम पाॅईंटपर्यंत २ कि.मी..
सहा महिन्यात सायकल ट्रॅकचे निर्माण होणार
सध्या सिंमेंट रोडचे काँक्रिटीकरण सुरू आहे. ते पूर्ण होण्यास अद्याप काही दिवस लागतील. त्यामुळे शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतरही सायकल ट्रॅकचे काम थांबले आहे. येत्या सहा महिन्यात सायकल ट्रॅकच्या निर्माण कार्याला सुरुवात होईल.आम्ही हे काम वेगाने आणि वेळेत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- दिपक वा. आत्राम, स्ट्रीट विथ सायकल ट्रॅक, राज्यस्तरीय समिती सदस्य
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.