आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्ड्यांमुळे होणारे मृत्यू हे राज्य सरकारने केलेले खून : धनंजय मुंडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- यंदा पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांनी १५ पेक्षा जास्त् बळी घेतले. त्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी विराेधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी विधान परिषदेत केली. त्यावर मृतांच्या कुटुंबांना नुकसान भरपाईची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील रस्त्यांची जबाबदारी संबंधित संस्थांची आहे. टप्प्याटप्प्याने राज्यातील सर्व रस्ते काँक्रीटचे करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.  


मुंडे म्हणाले, २०१६ मध्ये रस्त्यावरील अपघातांची संख्या ३२९ होती, ती २०१७ मध्ये ७२६ झाली आहे. अपघातांपेक्षा बळींपेक्षा खड्ड्यांमुळे झालेले मृत्यू अधिक आहेत. राज्य खड्डेमुक्त करू, असे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारने स्मार्ट सिटीचे फक्त स्वप्न दाखवले, प्रत्यक्षात शहरांना ‘मर’ सिटी केली. यावर उपाययोजना करण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी असंवेदनशील विधान करून पीडित कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप त्यांनी केला. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, रस्त्यांच्या क्षमतेपेक्षा अवजड वाहतूक होत असल्याने डांबराऐवजी काँक्रीटचे रस्ते हाच त्यावरील पर्याय अाहे. 


२२ हजार किलोमीटरचे रस्ते नॅशनल हायवे अॅथॉरिटीच्या माध्यमातून काँक्रीटचे केले जात अाहेत. मात्र, कल्याण-डोंबिवली असो, मुंबई असो वा भाजपची सत्ता असलेले नागपूर असो, महानगरपालिकांच्या हद्दीतील रस्त्यांची देखभाल आणि त्यावरील खड्डे ही त्याच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. २ लाख ५६ हजार किलोमीटरचे रस्ते जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेतून बनवलेले असल्याने त्यास राज्याचे  सार्वजनिक बांधकाम खाते जबाबदार नाही, अशी भूमिकाही पाटील यांनी मांडली. त्यावर विराेधकांनी अाक्षेप घेतला.  सभागृहात गदारोळ घातला. विरोधी पक्षाच्या बाकांवर असताना रस्त्यांवरील खड्ड्यांवर टीका करणारे व सत्तेवर येताच खड्डेमुक्त राज्याची घोषणा भाजप विसरले, अशी टीका काँग्रेसचे भाई जगताप यांनी केली.


मी संवेदनशून्य नाही : चंद्रकांत पाटील  
मला सांगली पालिका निवडणूक प्रचारावेळी पत्रकार परिषदेत खड्ड्यांचा प्रश्न विचारण्यात आला. त्या वेळी आपण दिलेल्या प्रतिक्रियेचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. रस्त्यांवरून अनेक वाहने जातात, अनेक अपघात होतात, सगळ्यांना खड्डे हेच कारणीभूत नसतात, असे आपल्याला म्हणायचे होते; परंतु यात कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो. मी एवढा संवेदनशून्य माणूस नाही, असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.  

बातम्या आणखी आहेत...