आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राईनपाडा व अन्य घटनांची एसआयटी चौकशी करा; विधान परिषद विराेधी पक्षनेते मुंडे यांची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राईनपाडा व अलीकडच्या काळात घडलेल्या अशा सर्व घटनांची पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राईनपाडा येथील हत्याकांडाविषयी उपस्थित अल्पकालीन चर्चेदरम्यान बोलताना केली. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे अफवांमुळे बळी गेलेल्या पाच जणांच्या मृत्यूप्रकरणी बुधवारी नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा सुरू करण्यात आली. या चर्चेत बोलताना मुंडे यांनी राज्य सरकारवर टीका केली. 


५ जणांच्या कुटुंबांना २५ लाख रुपयांची मदत करून त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी दिली पाहिजे, अशी मागणीही मुंडेंनी केली. आज मुद्रित व इलेक्ट्राॅनिक मीडियापेक्षा सोशल मीडिया वरचढ झाला आहे. एका क्षणात खातरजमा न करता बातमी पसरते. त्यामुळे साेशल मीडियावरून अफवा पसरू नये, यावर प्रतिबंध घालणारा कायदा करण्यात यावा, अशी मागणी मुंडे यांनी केली. 


चुकीचा संदेश जाऊ नये 
कपिल पाटील यांनी केवळ अफवांमुळे हे बळी गेले असे मानायला मी तयार नाही, असे चर्चा प्रारंभ करताना सांगितले. सोशल मीडियांचे अफवांचे बळी म्हणून हे प्रकरण सोडून देता कामा नये, असे ते म्हणाले. समूहाने केलेलीहत्या पचू शकते, असा संदेश या नाथपंथी डवरी समाजाच्या हत्येने गेला आहे. भटक्या विमुक्तांच्या पुनर्वसनाचे कार्यक्रम गेल्या ६० वर्षांत अपयशी ठरले. सरकारने या प्रकरणी कठोर भूमिका घ्यावी. राज्यातील सर्व समाजांची जातगणना झाली पाहिजे. भिक्षुकी वाट्याला आलेल्या समाजाला त्यातून सक्तीने बाहेर काढायला हवे, असे ते म्हणाले. पोलिसांच्या लेखी भटक्या जाती-जमातींची अजूनही गुन्हेगार म्हणून नोंद आहे. या बाबत पोलिसी मानसिकता बदलली पाहिजे. 


या चर्चेत नीलम गोऱ्हे यांनी साेशल मीडियावर अफवा फाॅरवर्ड करणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. रामहरी रूपनवर, चंद्रकांत रघुवंशी, नागो गाणार आदींनी या चर्चेत सहभागी होत मते मांडली. तूर्तास ही चर्चा मंत्र्यांच्या उत्तरासाठी राखून ठेवण्यात आली आहे. 


नीलम गोऱ्हे- धनंजय मुंडे यांच्यात चकमक 
चर्चेदरम्यान दुसऱ्या क्रमाकांवर उपसभापतींनी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हेंंचे नाव पुकारले. त्या वेळी धनंजय मुंडेंनी चर्चेत आपले नाव दुसऱ्या क्रमाकांवर असल्यानेे बोलू द्यावे, अशी मागणी केली. त्यावरून सभागृहाचे कामकाज नेमके कोणत्या नियमानुसार चालावे, यावर खल झाला. 'तुम्हाला मला बोलू द्यायचे नाही', असा आरोप गोऱ्हे यांनी मुंडेंवर केला. 'सदनाच्या दोन सदस्यांत अशा प्रकारे गैरसमज होत असेल तर कामकाजाला अर्थ राहत नाही. ताईंना मी कशाला थांबवू', असा सवाल मुंडे यांनी केला. त्यानंतर उपसभापतींनी मुंडे यांना बोलण्यास सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...