आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी टंचाईमुळे चंद्रपूर औष्णिक केंद्रातील वीज निर्मिती निम्म्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - चंद्रपूरमधील औष्णिक वीज केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या इरई धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने या केंद्रातून वीज निर्मितीत कपात करण्यात आली असून केवळ दीड हजार मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे.

 

इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा होतो. पिण्यासाठी पाणी शिल्लक राहावे, यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वीज केंद्राची निर्मिती क्षमता २९२० मेगावॅट एवढी असली तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. इराई तळ गाठत असल्याने त्यात मोठी कपात करावी लागत आहे. मार्चपर्यंत हे नियोजन राहणार आहे. त्यानंतर जो साठा धरणात उपलब्ध राहील, त्यानुसार वीज केंद्र पुढील नियोजन करणार आहे. तोवर ५०० मेगावॅटचे प्रत्येकी तीनच संच सुरू ठेवले जाणार आहेत.इरई धरणाची एकूण क्षमता १६८ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. यापैकी केवळ २७ दशलक्ष घनमीटर साठा शिल्लक आहे. सध्या दीड हजार मेगावॅट वीजनिर्मितीसाठी महिन्याला साडेतीन दशलक्ष घनमीटर एवढे पाणी लागते.


शिवाय चंद्रपूर शहराला महिन्याकाठी एक दशलक्ष घनमीटर पाणी लागते. सरासरी पाच दशलक्ष घनमीटर एवढे पाणी महिन्याला लागते. उपलब्ध साठा आणि ही गरज बघितल्यास धरणातील साठा आणखी पाच महिने पुरू शकतो. म्हणजेच मे-जूनपर्यंत हे पाणी संपेल. वेळेवर पाऊस न पडल्यास वीज केंद्र बंद करण्याची पाळी येऊ नये म्हणून, चंद्रपूर महानगरपालिकेने वर्धा नदीतून सहा दशलक्ष घनमीटर पाणी ओढण्याचे नियोजन केले आहे. मार्चमध्ये उन्हाळा सुरू झाल्यावर राज्यभरात विजेची मागणी वाढत असते. राज्यातील हा सर्वात मोठा वीजनिर्मिती प्रकल्प आपल्या क्षमतेनुसार निर्मिती करीत नसेल, तर राज्याला भारनियमनाचा सामना करावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...