आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक युवतीचा अाक्षेपार्ह फोटो 'स्टेटस' ठेवणाऱ्या इंजिनिअर युवकाला अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शहरात राहणाऱ्या एका शिक्षक युवतीची भुसावळ येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय अभियंता युवकासोबत ओळख होती. त्यामुळेच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान १४ एप्रिल २०१८ ला त्यांचा साखरपुडा झाला. मात्र त्यानंतर त्यांच्यात वैचारिक मतभेद आले व त्यांनी जुळलेले लग्न न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान अभियंता   युवकाने शिक्षक युवतीचे अाक्षेपार्ह छायाचित्र स्वत:च्या सोशल मीडियाला 'स्टेटस' म्हणून ठेवले होते. या प्रकरणात युवतीच्या तक्रारीवरून सायबर ठाण्याच्या पोलिसांनी गुन्हा नोंदवून शुक्रवारी (दि. २५) अभियंता युवकाला अटक केली. 


ऑलविन एडवर्ड डेव्हीड (३२, रा. भुसावळ, जि. जळगाव) असे पोलिसांनी अटक केलेल्या अभियंता युवकाचे नाव आहे. ऑलविन सध्या कामानिमित्त पुण्यात राहतो. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी शहरात राहणाऱ्या एका शिक्षक युवतीसोबत त्याची ओळख झाली. दोघांनीही लग्न करण्याबाबत विचार विनिमय करून आपआपल्या कुटूंबियांना सांगितले. त्यामुळे १४ एप्रिलला त्यांचा साखरपुडा झाला. मात्र त्यानंतर काही दिवसातच ऑलविन या युवतीवर संशय घेऊ लागला. त्यामुळे त्यांच्यात वैचारिक मतभेद निर्माण झालेत. म्हणून त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेवून १९ मे २०१८ ला युवकाच्या घरी जावून लग्न तोडले. दरम्यान, ऑलविनने १९ मेपासून त्याच्या सोशल मीडियावर शिक्षक युवतीचे अाक्षेपार्ह छायाचित्र 'स्टेटस' म्हणून ठेवले. हे आक्षेपार्ह छायाचित्र सदर युवती व तिच्या बहिणीला दिसतील, असे 'सेटींग्स' त्याने केले होते. तेच छायाचित्र त्याने 'स्टेटस' ठेवून प्रसारित केल्यामुळे युवतीने २४ मे रोजी सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून सायबर ठाण्याच्या पोलिसांनी ऑलविनविरुद्ध विनयभंग तसेच माहिती व तंत्रज्ञान कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, शुक्रवारी सायबर ठाण्याच्या पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले. चौकशीअंती पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अनिल कुरळकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय ईश्वर वर्गे व त्यांचे पथक करत आहे. 


सायबर ठाण्यात अटक झालेला पहिला आरोपी 
१ एप्रिल २०१८ ला सायबर पोलिस ठाण्याचे कामकाज आयुक्तालयात सुरू झाले. मागील ५६ दिवसांत सायबर पोलिस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल झालेत. त्यामध्ये हा नववा गुन्हा आहे. या गुन्ह्यातील आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. सायबर पोलिस ठाण्याच्या स्थापनेपासून सायबर ठाण्यात गुन्हा दाखल होऊन अटक झालेला हा पहिला आरोपी ठरला आहे. 

बातम्या आणखी आहेत...