आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया ७ ते १९ जून या कालावधीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- नुकतेच १२ वी आणि एमएचटी सीईटी २०१८ परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून राज्यात प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून अधिसुचनाही मिळाली आहे. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रथम आॅनलाईन नोंदणी करायची आहे. नोंदणीसाठी ७ जून ते १९ जूनपर्यंत लिंक उपलब्ध असणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक जिल्ह्यातील विविध संस्थांमध्ये सुविधा केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डाॅ. डी.व्ही.जाधव यांनी आज (दि.७ जून) दु. १ वाजता मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत दिली. 


सुविधा केंद्रांची यादी, प्रवेश नियमावली आणि सविस्तर वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रांची माहिती देखील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती देण्यासाठी तंत्रशिक्षण, विभागीय कार्यालयाद्वारे १३ जून रोजी स. ११ वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहनही डाॅ. जाधव यांनी केले. 


राज्यात अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या फार मोठी असून येथून पदवी घेऊन बाहेर निघणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी िमळतेच असे नाही. मागणीच्या तुलनेत उत्पादनच जास्त अशी सध्याची स्थिती असल्यामुळे येथून पुढे राज्यात अन्य कोणत्याही तंत्रनिकेतन महाविद्यालयाला परवानगी द्यायची नाही, असा निर्णय शासनाने घेतल्याचेही डाॅ. जाधव यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी विभागाचे पदाधिकारी एम.ए.अलीही उपस्थित होते. 


विभागातील शासकीय तंत्रशिक्षण संस्थांच्या संख्येत वाढ 
शैक्षणिक सत्र २०१८-१९ पासून अमरावती विभागातील शासकीय तंत्रशिक्षण संस्थांमध्ये बदल झाले आहेत. शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ या संस्थेचे श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या संस्थेचे स्वरूप शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ असे झाले आहे. 


येत्या शैक्षणिक सत्रापासून येथे स्थापत्य अभियांत्रिकी ६०, संगणक अभियांत्रिकी ६०, विद्युत अभियांत्रिकी ६०, यंत्र अभियांत्रिकी ६० आणि अणूविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकीच्या ६० जागांची प्रवेश क्षमता असणार आहे. यासाठी भारतीय तंत्रशिक्षण परिषद, दिल्लीची मान्यता मिळाली असून हे महाविद्यालय डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे विद्यापीठाशी संलग्न असेल. असेही डाॅ. जाधव यांनी सांगितले. 


शासनाच्या या निर्णयामुळे अमरावती विभागात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या दोनवर पोहोचली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मुलांना पदविका प्रवेशाची संधी मिळावी म्हणून शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, यवतमाळ या केवळ महिलांसाठी असलेल्या तंत्रनिकेतनचे रुपांतर यंदाच्या सत्रापासून सह-शिक्षण (को-एज्युकेशन) करण्यात आले असून यंदाच्या सत्रापासून मुले व मुलींसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया येथे सुरू होणार आहे. ही संस्था शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ या नावाने ओळखली जाईल. येथे संगणक अभियांत्रिकी, माहिती व तंत्रज्ञान, अणूविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी, उपकरणीय उभियांत्रिकी, ड्रेस डिझायनिंग अॅण्ड गारमेंट मॅन्यूफॅक्चरिंग या ट्रेडसाठी प्रत्येकी ६० जागा अाहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. 


अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील नगर परिषद तंत्रनिकेतन, अचलपूर ही संस्था राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यात आली असून संस्थेचे नामकरण शासकीय तंत्रनिकेतन अचलपूर असे झाले आहे. शैक्षणिक सत्र २०१८-१९ पासून येथे स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, अणूविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी व यंत्र अभियांत्रिकी (प्रत्येकी ६० जागा) या ट्रेडसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू हाेईल. सर्व संस्थांचे शिक्षण शुल्क ईबीसी, शिष्यवृत्ती व इतर सवलती शासकीय नियमानुसार राहतील असेही तंत्रशिक्षण सहसंचालकांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...