आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचलपूर तालुक्यात पोषण आहारात एक्स्पायर्ड शेवया, 2 अंगणवाडी केंद्रावर पाकिटांचे वाटप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतवाडा - शासनाच्या पोषण आहरा योजनेअंतर्गत अचलपूर तालुक्यात अंगणवाडी केंद्रांवर एक्स्पायर्ड झालेला पोषण आहार मागील दोन महिन्यांपासून दिला जात असून अंगणवाडी केंद्रातील बालके, गर्भवती व स्तनदा माता तसेच किशोरवयीन मुलींच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.


अचलपूर तालुक्यातील रासेगाव येथील दोन अंगणवाडी केंद्रांवर चार महिन्यांची मुदत संपल्यावरही गेल्या दोन महिन्यांपासून प्रत्येकी २६० ग्रॅम शेवयांच्या ३८६ पाकिटांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थींचे आरोग्य धोक्यात आले. शासनाने अत्यंत उदात्त हेतूने ग्रामीण भागातील बालके, किशोरवयीन मुली, स्तनदा व गर्भवती मातांचे पोषण व्हावे व त्यांचे आरोग्य जपले जावे, यासाठी पोषण आहार योजनेंतर्गत पोषण आहार दिला जातो. मात्र या आहाराच्या दर्जालाच हरताळ फासण्यात आला असून गेल्या दोन महिन्यांपासून रासेगाव येथील दोन अंगणवाडी केंद्रांवर योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या शेवया या मुदतबाह्य असल्याचा धक्कादायक प्रकार काही सजग पालकांच्या सतर्कतेने उघड झाला आहे. त्यामुळे पोषण आहार योजनेतील लाभार्थींच्या आरोग्याला धाेका निर्माण झाला आहे.

 

महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग आयुक्तालय, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडीतील ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांसह गरोदर व स्तनदा माता, किशोरवयीन मुलींनाही पाकीटबंद पोषण आहाराचे वितरण करण्यात येते. अचलपूर तहसील अंतर्गत २११ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाडीतील चिमुकले, गरोदर महिला व स्तनदा मातेला पाकीटबंद पौष्टिक आहार पुरवला जातो. रासेगाव येथील दोन्ही अंगणवाडी केंद्रांना देखील हा पोषण आहार पुरवण्यात येतो. हा आहार पुरवठा करण्याची जबाबदारी उदगीर येथील व्यंकटेश्वरा महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेकडे आहे. अंगणवाडीतील बालकांना तसेच स्तनदा व गरोदर माता आणि किशोरवयीन मुलींना टेक ओव्हर रेशनसाठी (टीएचआर) उपमा, शिरा, शेवई, सुकळी हा पोषक आहार पुरवला जातो. हा आहार लाभार्थींना घरी आहारात वापर करण्यासाठी असतो. यामध्ये लाभार्थींना २६० ग्रॅम शेवयांची पाकिटे देतात. विशेष म्हणजे या पाकिटावर उत्पादन तारीख १३ ऑगस्ट २०१७ अशी नमूद असून हे उत्पादन चार महिन्यात वापरणे आवश्यक असल्याचे नमूद आहे.


२३८ बालके, १०२ किशोरवयीन मुली आणि ४६ गर्भवती व स्तनदा मातांना शेवयांच्या ३८६ पाकिटांचे वितरण करण्यात आले. मात्र या शेवयांच्या पाकिटाला ६ महिन्यांचा अवधी उलटला. तरी त्याकडे डोळेझाक करून त्याचा पुरवठा करणे सुरूच होते. सुदैवाने ही बाब काही जागरूक लाभार्थींच्या लक्षात आली. विशेष म्हणजे आहार पुरवणारी एजन्सी थेट आहार अंगणवाडी केंद्रांना पोहोचवते. तो योग्य आहे का याची तपासणी होते किंवा नाही याबाबतही लाभार्थी पालक साशंक असून या आहाराची तपासणी संशयास्पद असल्याचे नाकारता येत नसल्याची खंतही लाभार्थींनी व्यक्त केली.


आहार वाटप थांबवले
अचलपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या रासेगाव येथील शेवईचा मुदतबाह्य असणारा आहार वितरीत करणे त्वरित थांबवले आहे. त्याची रीतसर चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येईल.
- दीपक ठवळे, प्रभारी बाल प्रकल्प विकास अधिकारी, अचलपूर.

 

याबाबत चौकशी करण्यात येईल
रासेगाव येथील दोन अंगणवाडी केंद्रावर मुदतबाह्य पोषण आहाराचे वितरण करण्यात येत असल्याची बाब पुढे आली आहे. त्याची योग्य चौकशी करू.
- कैलाश घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण, अमरावती.

 

बातम्या आणखी आहेत...