आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वैदर्भीयांना दिलेल्या वचनांचा विसर पडला आहे. हे दोघेही िवदर्भाचे गजनी असून ते कदापि आपल्याला विदर्भ देणार नाही. त्यांना महाराष्ट्रभर राज्य करायचे आहे, अशी तीव्र भावना विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीचे पूर्व विदर्भ उपाध्यक्ष संदीप लोणारे यांनी व्यक्त केल्या. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात युवा संसदने झाली. यात विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीचे विभागीय उपाध्यक्ष कपिल इद्दे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्रदीप धामनकर, नागपूर शहर युवा अध्यक्ष मुकेश मासुरकर, युवा आघाडीचे पूर्व विदर्भ उपाध्यक्ष संदीप लोणारे, नागपूर जिल्हा ग्रामीण महिला अध्यक्ष पौर्णिमा भिलावे, अमरावती जिल्हा युवा अध्यक्ष अमोल भिसेकर, वर्धा जिल्हा युवा अध्यक्ष गजानन निकम, पूर्व विदर्भ अध्यक्ष डॉ. दीपक मुंडे यांनी सहभाग नोंदवला. युवा संसदेच्या अध्यक्षस्थानी गौतम कांबळे होते. सर्व युवा कार्यकर्त्यांनी भाजपा सरकारविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या.
विदर्भावर बेरोजगारीचे सावट असून येत्या काळात युवक आत्महत्या करताना दिसतील. आता दुसऱ्याला दावणीला बांधण्यापेक्षा आमची दावणी मजबूत करण्याची वेळ आली आहे. विदर्भ हा आमच्या जन्म-मरणाचा प्रश्न आहे. विदर्भ वेगळा देणार नाही, तोपर्यंत केंद्राला सहकार्य मिळणार नाही, हा संदेश केंद्रापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे, असे संदीप लोणारे म्हणाले.
पौर्णिमा भिलावे यांनी युवकांचे रक्त विदर्भासाठी सळसळले पाहिजे, असे सांगितले. विविध जिल्ह्यातील लोक अधिवेशनाला आलेत. पण नागपुरातील लोक मात्र दिसत नाही, त्यांना विदर्भ नको आहे का, असा प्रश्न उपस्थित केला.
भाजपाला प्रथम सत्तेतून हद्दपार करायचे की विदर्भ राज्य वेगळे पाहिजे आहे, याचा प्राधान्यक्रम प्रथम ठरवावा लागेल. निवडणुकीसाठी थोडासाच कालावधी राहिलेला असून आपल्या हाती केवळ आठ महिने राहिले आहेत. या काळात नेत्यांचा राजकीय सभा विदर्भवाद्यांनी जरी उधळल्या तर सरकारवर दडपण येईल, असे कपिल इद्दे म्हणाले.
मुकेश मासुरकर यांनी, विदर्भ वेगळा झाला तर त्याचा सर्वाधिक फायदा युवावर्गाला होणार आहे, याची जाणीव त्यांना करून देण्याची गरज आहे, असे स्पष्ट केले. डॉ. दीपक मुंडे यांनी बेरोजगारीचे मूळ कारण शिक्षणात असल्याचे सांगितले. श्रीराम सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आकाश सफोलकर, अमरावतीचे नंदू खेर्डे, नरेंद्र मोहोड, तेजस गायधने, सतीश दाणी यांनीही आपले विचार मांडले. प्रास्ताविक कपील इद्दे यांनी केले तर संचालन मितीन भागवत यांनी केले. अभ्यूदय कोसे यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.