आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिटकॉइनसंबंधी फसवणूकीच्या चौकशीसाठी आर्थिक गुन्हे कक्ष; गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- गुंतवणूकदारांना दरमहा बिटकाॅइनच्या स्वरूपात १५ टक्के लाभांश देण्याच्या अमिषाने काेल्हापूर, पुणे, सांगली, मुंबईसह अनेक शहरात पाच कंपन्यांनी केलेल्या फसवणुकीच्या तपासासाठी विशेष चौकशी पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येईल, तसेच आर्थिक गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यस्तरावर आर्थिक गुन्हे कक्ष स्थापन करणार असल्याची माहिती गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले यांनी या प्रश्नी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तरात केसरकर म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली आर्थिक गुन्हे कक्ष सुरू केला आहे. याद्वारे आर्थिक गुन्ह्याबाबतची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेट बिटकाॅइन, फिलनस्टोन, झिपकाॅइन यांसह ५ कंपन्यांनी राज्यात गुतंवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक केली. या कंपन्यांच्या संचालकांवर 'लूक आऊट' नोटीस जारी केली आहे. त्यांच्यावर 'एमपीआयडी' कायद्याखाली कारवाई चालू आहे. या कंपन्यांच्या राज्यातील मालमत्ताही ताब्यात घेतल्या आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करू, असेही केसरकर म्हणाले. 


बिटकॉइनप्रकरणी विशेष तपास पथक 
फसवणूक केलेल्या या बिटकाॅइन कंपन्यांचे व्यवहार थांबवण्यात यावेत व त्यांची परदेशातील मालमत्ताही ताब्यात घेण्यात यावी, अशी मागणी सदस्यांनी केली. सध्या या प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलिस महासंचालक करत आहेत. पण, गरज वाटल्यास सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) मदत घेण्यात येईल, असे केसरकरांनी स्पष्ट केले. परंतु, त्यांच्या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही. 

बातम्या आणखी आहेत...