आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंधाऱ्याच्या पाण्याने वाहत आहेत शेतकऱ्यांची स्वप्ने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारणी- मेळघाटातील आदिवासींच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील अाहे. मात्र अधिकाऱ्यांचे उदासीन धोरण आदिवासींच्या विकासाला आड येते. अशीच प्रचिती येथील गडगा नदीवर लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याची सद्य स्थितीतील अवस्था पाहून येतेे. बंधाऱ्यावरील नादुरुस्त प्लेट्स फुटल्याने बंधाऱ्यात साठलेले पाणी वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे नुकसान होत आहे. पिकाचे नुकसान होत असल्याने आदिवासी शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे. 


धारणीपासून अवघ्या १० किमी. अंतरावर गडगा नदीच्या पात्रावर जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाद्वारे लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या नादुरुस्त प्लेट्स फुटल्यामुळे साठवलेले संपूर्ण पाणी वाहून गेले. याच कोल्हापुरी बंधाऱ्याच्या भरवशावर धुळघाट, कलमखार, खापरखेडा, पानखाल्या, गौलखेडा, गंभेरी अन्य गावातील आदिवासी शेतकऱ्यांनी पेरलेला गहू, हरबरा, ऊस इतर रब्बी पिके हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच नदीवर लघु सिंचन खात्याने धुळघाट मार्गावर हा बंधारा बांधला आहे. 


मात्र या बंधाऱ्यावरील प्लेट्स नादुरुस्त असल्याची बाब लक्षात येताच शेतामधील पिकाच्या हिताच्या दृष्टीने परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाला भविष्यातील संभाव्य धोका लक्षात आणून दिला. परंतु संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे डोळेझाक केल्याने अखेर हा बंधारा फुटला त्यामधील सर्व पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाच नुकसानीचा सामना करावा लागत आहे. परिणामी या प्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसह नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. 


लघु सिंचन अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी 
रब्बीच्या हंगामात पिकाच्या सिंचनासाठी पाणी अडवून साठवणूक केलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यातून संपूर्ण पाणी वाहून गेले. त्यासाठी लघु सिंचन खात्याचे अधिकारी सर्वस्वी जबाबदार असून, अशा अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी . 
- अशोक गुप्ता, शेतकरी, धुळघाट. 


वरिष्ठांकडे प्रस्ताव 
धुळघाट व्यतिरिक्त इतर १३ कोल्हापुरी बंधाऱ्याच्या डागडुजी मेंटेनन्सकरिता वरिष्ठ कार्यालयाकडे अनेकदा मागणी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. परंतु गेल्या तीन वर्षांपासून शासनाकडून कुठलाही निधी मिळाला नाही. एल.आर. सोनवणे, उपविभागीय लघु सिंचन अधिकारी तथा जलसंधारण विभाग, मेळघाट. 
कोल्हापुरी बंधाऱ्यावरील नादुरुस्त प्लेट्स फुटल्यामुळे साठवलेले पाणी वाहून गेले. 

बातम्या आणखी आहेत...