आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: आईशी वाद घालून घराबाहेर पडलेल्या युवतीवर चौघांनी केला अत्याचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- आईशी वाद झाल्याने घराबाहेर पडलेल्या शहरातील एका चौदा वर्षीय मुलीवर दोन दिवसांत वेगवेगळ्या वेळी आणि ठिकाणी चौघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून बुधवारी (दि. २३) रात्री चौघांना पकडले. त्यापैकी एक अल्पवयीन असल्यामुळे   इतर तिघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने २८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 


नरेंद्र बाजीराव महाजन (३१), शुभम ऊर्फ बबलू श्रीकृष्ण मेश्राम (२८) आणि अक्षय किशोर मेश्राम (२७, तिघेही रा. महादेवखोरी) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील पीडीत चौदा वर्षीय मुलीचे आईसोबत भांडण झाले असल्यामुळे ती १७ मे रोजी रात्री घरी गेली नाही. दरम्यान १८ मे रोजी सकाळी अंबादेवी मंदिरात गेली,दिवसभर मंदिरात थांबली व रात्री पुन्हा महादेवखोरी भागात गेली. त्या रात्रीही ती घराबाहेरच झाेपली. दरम्यान १९ मे रोजी सायंकाळी महादेव खोरी भागातील पुलाजवळ तिला नरेंद्र महाजन भेटला, कुठे जात आहे, असे विचारले असता तिने आईसोबत भांडण झाले व घरी जायची भिती वाटत आहे,असे त्याला सांगितले. यावेळी त्याने सहानुभूती दाखवून तिला स्वत:च्या घरी आणले. त्यादिवशी रात्री दहा वाजताच्या सुमारास त्याने घरातच युवतीवर अतिप्रसंग केला व त्याच ठिकाणी तिला डांबून ठेवले. आईसोबत भांडण केले असल्यामुळे या प्रकाराची कुठेही वाच्यता युवतीने केली नाही. असे तक्रारदार युवतीने तक्रारीत नमूद केले आहे. 


दरम्यान २१ मे रोजी ही युवती कशीबशी नरेंद्रच्या घरातून बाहेर निघाली. त्याचवेळी भीमटेकडी येथे जात असताना अक्षय भेटला, त्याला पीडितेने नरेंद्रने केलेल्या अत्याचाराबाबत माहिती दिली. त्यावेळी अक्षयने तिला सहानुभूती देवून जेवण करण्यासाठी एका हॉटेलमध्ये आणले व त्यानंतर त्याच्या विक्की नामक मित्राकडे नेले. त्याठिकाणी अक्षय, शुभम व एका अल्पवयीनाने आळीपाळीने सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप युवतीने केला आहे. या प्रकरणी युवतीने तिच्या आईला सांगितले. दुसरीकडे आईने मुलीचा शोध सुरूच ठेवला होता. १७ मे रोजी मुलगी हरविल्याची तक्रारही आईने पोलिसात दिली होती. दरम्यान हा प्रकार मुलीने सांगितल्यानंतर तिची आई बुधवारी सांयकाळी तिला घेऊन फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात पोहचली. पोलिसांना तिने तक्रार देताच पोलिसांनी चौघांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. 


दरम्यान चौघांना बुधवारी रात्रीच पकडले मात्र एक अल्वपयीन असल्यामुळे तो वगळता इतर तिघांना अटक केली. त्या तिघांना गुरूवारी (दि. २४) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांनी दिली आहे. ही घटना पाहता शहरातील इतर युवतींनी बोध घेण्याची गरज आहे. 

बातम्या आणखी आहेत...