आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकतर्फी प्रेमातून चौदा वर्षीय मुलीने हातावर ब्लेड मारून केला युवकाला फसवण्याचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शिकवणी वर्गाच्या परीक्षेसाठी जात असताना दोन दुचाकीवर आलेल्या चौघांपैकी एकाने पाठलाग करून माझ्या हातावर ब्लेड मारले, अशी गंभीर तक्रार घेऊन एक १४ वर्षीय मुलगी रविवारी (दि. १०) दुपारी एक वाजताच्या सुमारास फ्रेजरपुरा पोलिसांत पोहोचली. तक्रार ऐकून पोलिसही चक्रावले. त्यांनी तातडीने ज्या युवकावर मुलीने आरोप केले होते, त्याला चौकशीसाठी आणले. मात्र पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही तपासून माहिती काढली असता, मुलीनेच स्वत:च हातावर ब्लेड मारून युवकाला फसवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. 


ज्या युवकावर आरोप केला त्याच्यावर आपण एकतर्फी प्रेम करते मात्र तो प्रतिसाद देत नसल्यामुळे हा प्रकार केल्याचेही मुलीने शेवटी पोलिसांना सांगितले. यशोदानगर चौकात उभी असताना दोन दुचाकीवर चार युवक आलेत. त्यापैकी तिघांनी चेहऱ्याला कापड बांधले होते. मात्र एकाला मी ओळखते. तो युवक साडेसतरा वर्षांचा आहे. मागील पंधरा दिवसांपासून तो पाठलाग करत आहे. आज त्याने चौकात आल्यानंतर माझ्या हातावर ब्लेडने वार केला. दरम्यान पोलिसांनी सदर मुलीची वैद्यकीय तपासणी करून आणली. तसेच त्या युवकालाही ठाण्यात आणले. चौकशी दरम्यान मुलीने ज्या ठिकाणी ब्लेड मारल्याचे सांगितले, त्या ठिकाणी पोलिस पोहचले व त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराचे फूटेज तपासले. त्यावेळी जवळपास पंधरा मिनीट ही मुलगी एकटीच उभी होती, ज्या युवकावर आरोप होता, तो त्या ठिकाणी आल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले नाही. त्यामुळे पोलिसांनी अधिक माहिती घेतली व मुलीची चौकशी केली तर रविवारी सायंकाळीच तिनेच पोलिसांना कबुली दिली की, माझे त्या युवकावर प्रेम आहे मात्र तो प्रतिसाद देत नाही. इतकेच नाही तर काही दिवसांपुर्वी मुलीच्या आईने त्या युवकाच्या घरी जाऊन मुलाला आम्ही खोट्या तक्रारीत अडकवणार, अशी धमकीसुध्दा युवकाच्या आईला दिली होती. या प्रकरणात रविवारी सायंकाळी युवकाच्या आईने मुलीसह तिच्या पालकांविरुध्द तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली होती. 


मुलीने स्वत:च मारून घेतले हातावर ब्लेड 
दुचाकीवर पाठलाग करून युवकाने हातावर ब्लेड मारल्याची तक्रार चौदा वर्षीय मुलीने दिली होती. मात्र सीसीटीव्ही तपासणी तसेच अधिक माहीती घेतली असता युवक सदर मुलीजवळ गेलाच नसल्याचे समोर आले. मुलीने स्वत:च ब्लेड मारून घेतल्याची कबूली दिली. तसेच ती सदर युवकावर एकतर्फी प्रेम करत असल्याचे पुढे आले आहे. युवकाच्या आईने तक्रार दिल्यास मुलीसह तिच्या पालकांविरुध्द गुन्हा दाखल होऊ शकतो. 
- आसाराम चोरमले, ठाणेदार, फ्रेजरपुरा. 

 

बातम्या आणखी आहेत...