आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार लिंकिंग अत्यल्प; तरी धान्याची उचल शंभर टक्के, २१ जणांना शोकॉज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचा आधार लिंकचा 'परफॉर्मन्स' अत्यल्प आहे. अशा परिस्थितीत धान्याची शंभर टक्के उचल केली, परंतु 'ऑफलाइन' पद्धतीने धान्य वाटप केले. अशात यवतमाळ तालुक्यातील दोन दुकानाचे परवाने निलंबित करण्यात आले. तर तब्बल २१ स्वस्त धान्य दुकानदारांना शोकॉज बजावण्यात आली आहे. 


शासनाने धान्य वाटपासाठी नवीन प्रणाली लागू केली आहे. यात प्रामुख्याने लाभार्थ्यांचे आधार क्रमांक रेशनकार्डशी संलग्नित करणे अनिवार्य केले होते. त्याशिवाय धान्य वाटप करता येणार नव्हते. आधार कार्ड लिंक करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा विभागास तहसीलच्या पुरवठा विभागाने आवाहन केले होते. तरीसुद्धा स्वस्त धान्य दुकानदारांनी आधार लिंक करण्याकडे दुर्लक्ष केले. मागील सात ते आठ महिन्यापासून जिल्हा पुरवठा विभागाकडून शंभर टक्के धान्य स्वस्त धान्य दुकान उचल करीत आहे. प्रत्यक्षात मात्र, आधार लिंक नसल्याचे कारण देऊन लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यात येत नाही. अशा परिस्थितीत प्राप्त झालेले धान्य थेट काळ्याबाजारात विक्री केल्या जात आहे. मागील सात ते आठ महिन्यापासून सुरू असलेल्या प्रकाराकडे जिल्हा पुरवठा विभागाने दुर्लक्ष केले. आता कुठे पुरवठा विभागाला जाग आली असून, स्वस्त धान्य दुकानदारांना आधार कार्ड लिंकसाठी जबाबदार धरण्यात येत आहे. 


यासंदर्भात स्वस्त धान्य दुकानदारांचा 'परफॉर्मन्स'ची माहिती घेण्यात आली. यात धक्कादायक बाब उजेडात आली असून, जवळपास ८० टक्के स्वस्त धान्य दुकानदारांनी लाभार्थ्यांचे आधार लिंक केलेच नाही. परिणामी, यवतमाळ तहसील मधील दोन दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. यात इस्माईल जिंदानी आणि एच. डब्ल्यू. धलवार, असे निलंबित स्वस्त धान्य दुकानदारांचे नाव असल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. तर तालुक्यातील इतर २१ स्वस्त धान्य दुकानदारांना शोकॉज बजावण्यात आल्या असून, त्यांना 'परफॉर्मन्स' सुधरविण्याबाबत स्पष्ट निर्देश जारी केले आहे. यात येत्या काळात सुधारणा झाली नाही, त्यांच्याही निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आता धान्य वाटप करताना पॉश मशीनचा वापर अनिवार्य केला आहे. त्याशिवाय धान्याचे वाटप करता येत नाही. तरीसुद्धा रेशन दुकानदार थेट ऑफलाइन पद्धतीने धान्य वाटपाचा फंडा काढत आहे. 


बोगस रेशन कार्डचा होणार पर्दापाश 
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस रेशनकार्ड वाटप करण्यात आले आहे. त्या रेशनकार्ड धारकांना आधार लिंक करण्याबाबत स्पष्ट सूचना जारी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी मात्र स्वत: जिल्हा पुरवठा विभागाला पाठपुरावा करावा लागणार आहे. 


ऑफलाइन पद्धतीने केले धान्य वाटप 
साधारणत: वर्षभरापूर्वी आधार लिंक करण्याबाबतचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने स्वस्त धान्य दुकानदारांनी पावले उचलणे गरजेचे होते. असे असले तरी जिल्हा पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य दुकानदारांनी नियमित शंभर टक्के धान्याची उचल केली आहे. ह्या धान्याची उचल केल्यानंतर काही लाभार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने वाटप करण्यात आले, परंतु यातील अर्धेअधिक धान्य थेट काळ्याबाजारात विक्री करण्यात आल्याचे दिसून येत आहे. 

बातम्या आणखी आहेत...