आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातीविना शेतीतून ट्रेमध्ये पिकवला घरच्याघरी हिरवा सकस चारा, दीड ते तीन लिटरने वाढले उत्पादन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- दिवसेंदिवस वाढते शहरीकरण, त्यामुळे कमी झालेले चराई क्षेत्र, शेतकऱ्यांचा चारा पिकवण्याकडे कमी झालेला कल यामुळे जनावरांना सकस आणि पौष्टिक चारा मिळत नाही. पूर्वी शेतकरी ज्वारी हमखास पिकवायचे. आता ज्वारीचा पेरा कमालीचा कमी झालेला असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट झालेला आहे. नागपुरातील युवा संशोधक श्रृतिका कैलाश बागुल हिने यावर रामबाण उपाय शोधून काढला आहे. घरच्या घरी तयार करता येणाऱ्या आर. डी. हायड्रोपोनिक हिरवा चारा केंद्रामुळे ट्रेमध्ये हिरवा चारा घेता येतो. तेही माती विना! 


पूर्वी जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याचा प्रश्न आजच्या इतका बिकट नव्हता. शेतकरी ज्वारी, मका लावायचे. परंतु, अलिकडे रानडुकर, कोल्हे आदी जनावरांचा उपद्रव वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी ही पिक घेणे बंद केले. चारा उत्पादनासाठी सुपीक जमीनीची कमतरता, सिंचन, कुंपण, मर्यादित साधने, गुरेढोरे आणि वन्य प्राण्यांचा उपद्रव, लागवडीच्या व्यवहारासाठी मजुरीचा अधिक खर्च अशा अनेक गोष्टींमुळे शेतकरी चारा घेण्यास अनुत्सुक असतो. यावर घरच्याघरी उभारलेल्या ग्रीन हाऊसमध्ये आर. डी. हायड्रोपोनिक हिरवा चारा केंद्रात ट्रेमध्ये हिरवा चारा घेणे खूप किफायतशीर असल्याचे श्रृतिका बागुल हिने "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले. या चाऱ्यामुळे दुधाच्या चवीमध्ये फरक पडतो, साय खूप जाड येते आणि दीड ते तीन लिटर दुधाचे उत्पादन वाढते, असे श्रृतिकाने सांगितले. 


असा घ्या हिरवा चारा: ट्रेमध्ये हायड्रोपोनिक हिरवा चारा घेण्यासाठी बीयाणे वा बीज आधी धुवून घ्यावे लागते. त्यानंतर आपण मटकी मोड येण्यासाठी रात्रभर भिजत घालतो, तसे बियाणे भिजत घालून ठेवावे लागते. दुसऱ्या दिवशी अंकुरल्यावर ट्रेमध्ये टाकायचे. तत्पूर्वी ट्रे पुसून घेऊन कडक उन्हात वाळवून घेणे वा केमीकलने पुसून घेणे आवश्यक आहे. आठ ते दहा दिवसात चारा येतो. एका दिवसात सुमारे १०० किलो चारा तयार करता येतो. एका ट्रेमध्ये सहा ते सात किलो चारा तयार होतो. हा चारा दहा ते बारा दिवस टिकतो. कारच्या डिक्कीत ट्रे ठेवून सहज वाहतूक करता येते, असे श्रृतिकाने सांगितले. 


ट्रे ठेवण्यासाठी बांबूच्या रॅक केल्यास खर्च कमी येतो. साधारणत: घरच्या घरी ग्रीन हाऊस तयार करण्यासाठी ७० ते ८० हजार रूपये खर्च येतो. जागेनुसार हा खर्च कमी जास्त होऊ शकतो. हायड्रोपोनिक चाऱ्यासाठी मका अत्यंत उपयुक्त आहे. प्रथम हायड्रोपॉनिक्सच्या मदतीने बीजाचे निर्जंतुकीकरण करून बियाणे अंकुरल्यावर ते ट्रेमध्ये पसरवावे लागते. यासाठी सुमारे तापमान २५ ते २६ अंश सेल्सियस आणि आर्द्रता ६० ते ८० टक्के दरम्यान असणे आवश्यक आहे. 

बातम्या आणखी आहेत...