आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषीपंपांना लवकरच उच्चदाबाचा वीज पुरवठा; हाय व्होल्टेज वीज जोडणी मिळणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी लवकरच हाय व्होल्टेज वीज जोडणी मिळणार आहे. यासाठी महावितरणने जाहीर केलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतील (एचव्हीडीएस) कामांची ऑनलाईन निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सुमारे ८०४ कोटी रुपयांच्या कामांच्या या पारदर्शी निविदा प्रक्रियेतून विदर्भातील ५० हजार ३६५ कृषीपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीच्या माध्यमातून वीजजोडणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 


या योजने अंतर्गत यापुढे एका वितरण रोहीत्रावर जास्तीत जास्त दोन ते तीन कृषीपंप असणार आहेत. सततच्या वीज पुरवठा खंडित होण्याच्या कटकटीपासून यामुळे शेतकऱ्यांची आता कायमची सुटका होणार आहे. या योजनेसाठी लागणाऱ्या वितरण रोहीत्र खरेदीची निविदा प्रक्रिया महावितरण मुख्यालयाकडून यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. 


या योजने अंतर्गत ३१ मार्च २०१७ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषीपंपांना वीज जोडणी देण्याची घोषणा विधिमंडळात करण्यात आली होती या अनुषंगाने राज्यस्तरावर सर्व्हेक्षण करण्यात येऊन याबाबतची योजना तयार करण्यात आली. यानुसार महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात ३१ मार्च २०१७ सोबतच ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषीपंपाच्या वीज जोडण्यांचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय शेतकऱ्यांसह नव्याने मागणी करणाऱ्या ग्राहकाला एचव्हीडीएस या योजनेतून जोडणी दिली जाणार आहे. सध्या ६५ व १०० केव्हीए क्षमतेच्या एका रोहित्रावरून २० ते २५ कृषीपंपांसाठी वीज पुरवठा केला जातो. सोबतच आकडे टाकून विजेचा वापर करणारांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वीजेचा दाब वाढून रोहित्र जळण्याचे प्रमाणही अधिक आहे. प्रचलित पद्धतीमुळे लघुदाब वाहिनीची लांबी वाढते, वीज हानी मोठ्या प्रमाणात होते. शिवाय कृषीपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा होतो. वीजपुरवठ्यात वारंवार बिघाड होतो. यावर एचव्हीडीएस योजनेद्वारे या सर्वांवर मात करता येणे शक्य होणार आहे. 


या योजनेत अकोला जिल्ह्यासाठी १३२ कोटी ४५ लाख, बुलढाणा जिल्ह्यासाठी १२७ कोटी १६ लाख, यवतमाळ १०७ कोटी ८७ लाख, वाशिम जिल्ह्यासाठी ९९ कोटी ५ लाख, अमरावती ८७ कोटी, नागपूर ५८ कोटी ७८ लाख, चंद्रपूर ५५ कोटी २२ लाख, भंडारा ४९ कोटी २२ लाख, वर्धा ३५ कोटी ७६ लाख, गोंदीया ३२ कोटी ५४ लाख तर गडचिरोली जिल्ह्यासाठी १४ कोटी ७० लाख रुपयांच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...