आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मिहानमध्ये औद्योगिक प्रकल्प

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- इंग्लंड येथे स्थायिक झालेले प्रसिद्ध व्यावसायिक रोहित शेलाटकर यांनी विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता नागपूर येथील मिहान प्रकल्पामध्ये औद्योगिक प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मागील आठवड्यात मिहानला भेट देऊन पाहणी केली. विदर्भ व मराठवाड्यातील बिकट आर्थिक स्थिती असलेले शेतकरी, त्यांची मुले तसेच शेतकरी विधवांना शेलाटकर यांनी स्थापन केलेले ग्रँड मराठा फाउंडेशन गेल्या पाच वर्षांपासून खते, बी-बियाणे तसेच शिक्षणासाठी आर्थिक मदत करीत आहेच. या उच्च शिक्षित मुलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाची आखणी करण्यात येत असल्याचे वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सांगितले. 


यावर्षीही अभियांत्रिकी संगणक शिक्षणासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना तसेच शेतकरी विधवांना पेरणीसाठी बी-बियाण्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी उपस्थित होते. सायखेडा येथील आदिवासी शेतकरी विधवा चंद्रकला मेश्राम तसेच मोरवा येथील आदिवासी शेतकरी विधवा कमलबाई सुरपाम यांना ग्रँड मराठा फाउंडेशनचे संचालक राजेश तावडे यांच्या हस्ते खरिपाच्या पेरणीकरिता मदत करण्यात आली. 

 

विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दिली आर्थिक मदत 
जयंत गावंडे, संतोष कांबळे, उमरखेडचे वैभव हुंबाडे, पुण्याच्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अमृता शिखरे तसेच संगणक पदविकेच्या शिक्षणासाठी वैष्णवी कोपुलवार, आदिवासी शेतकऱ्याची मुलगी समीक्षा गेडाम यांना पदविका पूर्ण करण्यासाठी वार्षिक शिक्षण शुल्क भरण्यासाठी मदतीचा धनादेश ग्रँड मराठा फाउंडेशनचे संचालक राजेश तावडे यांनी दिला. या वेळी शेलाटकर यांनी पोलंडवरून सर्व शेतकरी विधवा व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रत्येक अडचणीत मदतीला धावून येण्याचे आश्वासन या वेळी दिले. मागील वर्षीसुद्धा १०० शेतकरी विधवांना खरिपाच्या पेरणीकरिता कापूस व सोयाबीनच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले होते. 

बातम्या आणखी आहेत...