Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | 16 Percent quota reserve for maratha community in maharashtra govt 72000 jobs

नोकऱ्यांच्या महाभरतीत १६ टक्के जागा मराठा समाजासाठी राखीव; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 20, 2018, 06:57 AM IST

राज्य सरकारमार्फत भरल्या जाणाऱ्या 72 हजार नोकरभरतीमध्ये 16 टक्के जागा मराठा समाजाच्या राखीव जागा समजल्या जातील.

 • 16 Percent quota reserve for maratha community in maharashtra govt 72000 jobs

  नागपूर- मराठा समाजाला आरक्षण मिळणारच, असे गृहीत धरून आगामी काळात राज्य शासनाच्या वतीने होणाऱ्या नोकऱ्यांच्या महाभरतीत १६ टक्के जागा या समाजासाठी राखीव ठेवण्यात येतील. उच्च न्यायालयाचा आदेश होताच या जागा अनुशेष म्हणून भरून काढल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. स्थगन प्रस्तावाच्या सूचनेच्या माध्यमातून मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाचे मुद्दे गुरुवारी विधानसभेत उपस्थित झाले. या चर्चेला सविस्तर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार वचनबद्ध असल्याचे स्पष्ट केले.


  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेलच, असे सांगताना राज्य सरकारने केलेल्या उपायांची माहिती दिली, तर सरकार या आरक्षणांवर गंभीर नसून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. अजित पवार यांनी आजवर मराठा समाजाचे ५७ मोर्चे निघाले असताना आता समाजात असंतोष वाढत असून त्याचा उद्रेक होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली.


  आरक्षण मिळेपर्यंत नोकऱ्यांतील महाभरती थांबवा : विखे पाटील
  विखे पाटील म्हणाले, मराठा समाज व धनगर अारक्षणाचे काय झाले? मुस्लिमांना शिक्षणात ५ टक्के आरक्षणालाही सरकारने हरताळ फासला असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा आरक्षणापूर्वी सरकारने नोकऱ्यांतील महाभरती थांबवावी, अशी मागणी विखे यांनी केली.


  अामचे सरकार अल्पसंख्याक समाजाच्याही पाठीशी
  घटनेनुसार धर्माच्या आधारे आरक्षण देता येत नाही. मात्र, अाम्ही अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के शिक्षण शुल्क सवलत दिली. त्यात मुस्लिम समाजाचा समावेश आहे. त्यामुळे आम्ही अल्पसंख्याकांचे पाठीराखे आणि तुम्ही विरोधक असा आरोप करू नका, असे मुख्यमंत्र्यांनी अबू आझमी यांना सुनावले.


  सरकारकडून आरक्षणाची घोषणा हे विरोधी पक्षांचे यश
  नोकरभरतीत मराठा समाजासाठी १६ टक्के जागा रिक्त ठेवून आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर अनुशेष म्हणून त्या जागा भरण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा विरोधी पक्षांचे यश असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.


  धनगर आरक्षण अहवाल तयार

  धनगर समाजाला आरक्षणासाठी टाटा इन्स्टिट्यूटने सर्वेक्षण पूर्ण केले असून अहवालही जवळपास तयार आहे. तो कोणत्याही क्षणी येऊ शकतो. अहवालानुसार केंद्र सरकारकडे शिफारस केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.


  आरक्षणासाठी घटनात्मक प्रक्रिया पूर्ण : मुख्यमंत्री
  मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारकडून संपूर्ण घटनात्मक प्रक्रिया पूर्ण झाली असून हा मुद्दा आता न्यायालयाकडे आहे. मागासवर्गीय आयोगाचा याबाबतचा अहवाल येईल. तो सकारात्मकच राहील, अशी अपेक्षा आहे. राज्य शासन मराठा आरक्षणासाठी वचनबद्ध आहे. आगामी काळात राज्य शासनाच्या नोकऱ्यांच्या महाभरतीत १६% जागा मराठा समाजासाठी राखीव ठेवण्यात येतील. न्यायालयाचा आदेश होताच तो अनुशेष भरून काढला जाईल, असे फडणवीस म्हणाले.


  आघाडी सरकारमुळे आरक्षण कोर्टात टिकले नाही : शेलार
  मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगत भाजपचे अामदार अाशिष शेलार म्हणाले, आघाडी शासनाने केवळ ११ दिवसांच्या अभ्यासावर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करून राज्यातील मराठा समाजाची फसवणुकीचा प्रयत्न केला हाेता.'


  वारकऱ्यांना त्रास हाेणार नाही याची काळजी घ्या
  पंढरपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढी एकादशीची शासकीय महापूजा रोखण्याचा इशारा देण्यात आला अाहे. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, 'महापूजेची परंपरा जुनी आहे. तेथे होणारे अनुचित प्रकार भाविकांच्या भावना दुखावणारे ठरू शकतात. वारकरी आणि भाविकांना त्रास होईल, अशी कुठलीही कृती होऊ नये.'


  मुख्यमंत्र्यांना महापूजा करू देणार नाहीच : मराठा माेर्चा
  नाशिक | अाषाढी एकादशीला पंढरीत महापूजा करण्यापासून मुख्यमंत्र्यांना राेखण्याच्या निर्णयावर ठाम अाहाेत. त्यांना अाम्ही ही पूजा करू देणार नाहीच, असा पुनरुच्चार मराठा क्रांती माेर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

Trending