आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूगोल पुस्तकात गुजराथी मजकूर.. तटकरेंच्या आत्महत्येच्या इशाऱ्यावर चंद्रकांतदादांची दिलगिरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- इयत्ता सहावीच्या भूगोल विषयाच्या पुस्तकात सात पाने गुजरातीत छापल्यावरून शुक्रवारी विधान परिषदेत झालेल्या गोंधळात सभागृहाचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या आरोपामुळे दुखावलेले राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी सभागृहातच विष घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. याप्रकरणी चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी सभागृहात दिलगिरी व्यक्त केल्यामुळे या वादावर पडदा पडला.  

   
इयत्ता सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात सात पाने गुजरातीत छापल्यावरून विरोधकांनी १३ जुलै रोजी प्रचंड गोंधळ घातल्याने विधान परिषद पहिल्यांदा ३५ मिनिटे, दुसऱ्यांदा १० मिनिटांसाठी आणि तिसऱ्यांदा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली होती. 


दरम्यान, यावरून विरोधक आक्रमक झाल्याने सभागृहाचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘तुम्हीच जाेडून आणली ही पाने’, असा सुनील तटकरे यांच्यावर आरोप केला. त्यावर ‘हे मी छापून आणले हे तुम्ही सिद्ध केले तर इथेच विष घेऊन आत्महत्या करीन’, असा इशाराच तटकरेंनी दिला होता. तटकरेंच्या वक्तव्यावर संपूर्ण सभागृह अवाक् झाले. त्यानंतर सभापतींनी काम दिवसभरासाठी तहकूब केले होते.  सोमवारी चंद्रकांतदादा पाटील यांनी तटकरेंचे मन दुखावले असेल तर दिलगिरी व्यक्त करत असल्याचे जाहीर केले.  


सदोष बांधणीची पुस्तके बदलून मिळणार   
या विषयावर सोमवारी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी निवेदन केले. बालभारतीतर्फे दरवर्षी ८ भाषांतील १२ कोटी पुस्तकांची छपाई  केली जाते. २०१८-१९ मध्ये राज्यातील ११४ मुद्रकांनी छपाईच्या ९२ टक्के व परराज्यातील २८ मुद्रकांनी ८ टक्के छपाईची कामे केली. सहावीच्या मराठीच्या ११ लाख ५० हजार प्रती छापण्यात आल्या. ११ मुद्रकांना हे काम सोपवले होते. त्यापैकी १ लाख प्रतींच्या छपाईचे व बांधणीचे काम गुजरातच्या श्लोक प्रिंटसिटी प्रिंटर्सला दिले होते. त्यात बाइंडिंग करताना मराठी भूगोलाच्या पुस्तकात गुजराती पुस्तकाची पाने जोडण्यात आली. ही सदोष बांधणीची पुस्तके बालभारतीची सर्व विभागीय भांडारे व मंडळाच्या नोंदणीकृत वितरकाकडून बदलून देण्यात येतील, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी निवेदनात स्पष्ट केले. 


गुजरात मुद्रणालयावर कारवाई करणार
यापूर्वीही बालभारतीच्या पुस्तकांमध्ये अशा चुका झाल्या होत्या. त्या वेळी जयंत पाटील, धनंजय मुंडे आदींनी लक्षवेधीद्वारे लक्ष वेधले होते. अहमदाबादच्या श्लोक प्रिंटसिटी या मुद्रणालयावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देत तावडेंनी गुजराती पुस्तकात गुजराती व मल्याळी भाषेतील पाने लागली होती, याकडेही लक्ष वेधले.

 

बातम्या आणखी आहेत...