आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर- 'नागपुरच्या नागरिकांनो, आज मी माझा खटला घेऊन तुमच्या न्यायालयात आलो आहे, आता बहुमताने निवडून द्या'', असे साकडे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व पंतप्रधान पदाचे तत्कालीन उमेदवार अटलबिहारी वाजपेयी यांनी कस्तुरचंद पार्क येथे जमलेल्या विराट जनसमुदायाला घातले होते. त्यावेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करीत जनता-जनार्दनाने त्यांना कौल दिला होता. तारीख होती गुरूवार, 12 फेब्रुवारी 1998. अटलजींनी घातलेली ही साद आजही लोक विसरलेले नाहीत.
'तुम्हाला खरोखरच मला पंतप्रधानपदी पाहण्याची ईच्छा असेल तर भाजपा व मित्रपक्षांच्या एक-एक उमेदवाराला निवडून द्यावे लागेल, एक एक जागा, एक एक मत महत्वाचे आहे. प्रचंड प्रमाणावर मतदान करा, कमळावर शिक्का मारून मतपेट्या खच्चून भरा', असे कळकळीचे आवाहन वाजपेयींनी केले होते. नागपूर येथील सभेपूर्वी वाजपेयींनी विदर्भातील गोंदिया, अकोला आणि वर्धा येथेही विराट जाहीर सभा घेतल्या होत्या.
अखेरचा महाराष्ट्र दौरा नागपुरात
2007 सालीच वाजपेयींनी आतापर्यंतचा अखेरचा महाराष्ट्र दौरा केला. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजींच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या समारोपीय कार्यक्रमाला नागपूरच्या रेशीमबाग मैदानात संघ परिवाराच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले होते. एव्हाना वाजपेयींच्या चालण्या-फिरण्यावर बरीच बंधनं आली होती. त्यांच्या व्हीलचेअरसकट त्यांना स्टेजवर आणण्यासाठी एका विशेष लिफ्टची सोय करण्यात आली होती.
'वाजपेयी मैदानात आले आणि लोकांनी दिलेली प्रतिक्रिया अभूतपूर्व होती. लोक त्यांना पाहण्यासाठी धडपड करत होते. काही लोक तर उठून उभे राहिले, अनेकांनी पायातल्या चपला काढल्या आणि हात जोडून स्टेजवर आलेल्या वाजपेयींना नमस्कार केला', अशी आठवण संघातून सांगण्यात आली.
कुटुंबापासून राजकारण ठेवले दूर
'माझे मामा अटलबिहारी वाजपेयी नागपुरात आले की न चुकता घरी यायचे. घरी आले की, फक्त कौटुंबिक गोष्टी व्हायच्या. त्यांनी राजकारण कुटुंबापासून दूर ठेवले होते', अशी आठवण वाजपेयी यांची सख्खी भाची अनिता पांडे यांनी सांगितली. अटलजींच्या आठवणींना उजाळा देताना अनिता यांना गहीवरून आले होते.
नागपुरातील देवनगर चौकात अटलजींची भाची अनिता पांडे राहतात. अनिता या अटलजींची सर्वात लहान बहिण उर्मीला मिश्रा यांची मुलगी. डिसेंबर 1987 ला नागपुरातील व्यवसायी ओमप्रकाश पांडे यांच्यासोबत ग्वाल्हेर येथे त्यांचा विवाह झाला. लग्नात मामाजी (अटलजी) पूर्ण चार दिवस उपस्थित होते. अत्यंत साधेपणाने त्यांचा वावर होता. 1998 मध्ये पंतप्रधान झाल्यावरही ते घरी आले होते. आप्पाजी घटाटे व रजनी रॉय यांच्याशी त्यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. अत्यंत साधेपणाने मामा राहात. महाराष्ट्रीयन कढी त्यांना आवडत असे, अशी आठवण पांडे यांनी सांगितली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... अटलजींचे नागपुरातील निवडक फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.