आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाधानकारक पावसाने चंद्रपूर वीज केंद्रावरील निर्मिती बंदचे संकट अखेर टळले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राज्यातील सर्वात मोठ्या अशा चंद्रपूर जिल्ह्यातील औष्णिक वीज केंद्रासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात पुरेसा जलसाठा निर्माण न झाल्याने वीज निर्मिती बंद करण्याचे संकट आले होते. मात्र, मागील काही दिवसात झालेल्या समाधानकारक पावसाने हे संकट टळल्याची माहिती माहिती महानिर्मितीच्या सूत्रांनी दिली. 

 

इरई धरणातून चंद्रपूरमधील वीज निर्मितीसाठी पाणी पुरवठा होतो. मात्र, या धरणातील पाणी चंद्रपूर शहराची तहान भागविण्यासाठीही वापरले जाते. विदर्भात अनेक जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात पुरेसा पाऊस न झाल्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यात इरई धरणात केवळ 14 टक्केच पाणीसाठा शिल्लक होता. केंद्रातील पाचशे मेगावॉटचे जेमतेम तीन संच कसेबसे चालविले जात होते. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी 15 जुलैपासून धरणाचे पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मागील काही दिवसात चंद्रपूर जिल्ह्यात दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्याची स्थिती सुधारली आहे.  या धरणाची एकूण क्षमता 168 दशलक्ष घनमीटर एवढी असून सध्या 65 दशलक्ष घनमीटर एवढा साठा जमा झाला आहे. पाणीसाठा चाळीस टक्क्यांच्या आसपास पोहोचल्याने पिण्याच्या पाण्यासह आणि वीज केंद्राची गरजही भागविता येणार असल्याचे महानिर्मितीच्या अधिकार्‍यांनी सांगितले. विशेष म्हणजे वाढलेला जलसाठा लक्षात घेऊन केंद्राने 500 मेगावॉटचा चवथा संचही सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आगामी काळात धरण परिसरात चांगला पाऊस होणे देखील आवश्यक असल्याचे महानिर्मितीच्या आधिकार्‍यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...