आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेला पूर्वकल्पना देऊनच ‘नाणार’ आणला : मुख्यमंत्री फडणवीस यांचा विधानसभेत गौप्यस्फोट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- ‘उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना नाणार प्रकल्पाचे प्रेझेंटेशन (सादरीकरण) दिले होते. देसाई साहेबांना प्रेझेंटेशन देऊन भागले, असे वाटल्याने उद्धवजींपर्यंत गेलोच नाही,’ असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. नाणारच्या प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पाला शिवसेनेने जोरदार विरोध सुरू केला आहे. ‘शिवसेनेच्या मंत्र्यांना विश्वासात न घेता केंद्र सरकारने दिल्लीत करार केला,’ असा शिवसेनेचा आक्षेप आहे. मात्र, शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना नाणार प्रकल्पासंदर्भातली सर्व माहिती दिल्याचा खुलासा विधानसभेच्या पटलावर करून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या दाव्यातली हवा काढून घेतली आहे. दरम्यान, आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढेही सादरीकरण करणार का, याचे उत्तर मात्र मुख्यमंत्र्यांनी गुलदस्त्यात ठेवले.  नाणारच्या बाबतीतही अत्यंत समन्वयाने, सगळ्यांच्या शंका सोडवल्याशिवाय पुढे जाणार नाही. प्रकल्प लादणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.


देसाईंनी फाइल पाठवली, निर्णय नाही  
मुख्यमंत्री देवंेद्र फडणवीस यांनी सांगितले की, नाणार ग्रामस्थांच्या समितीशी चर्चा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा विरोध सुरू झाला. वस्तुस्थिती अशी की आंदोलन सुरू होते. पण काही लोक परवानगीही देत होते. मध्यंतरीच्या काळात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार भूसंपादन प्रक्रिया रद्द करत असल्याचे सांगितले. तशी फाइलही माझ्याकडे पाठवली. परंतु त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


समृद्धीलाही आधी विरोध केला होता
नाणार प्रकल्पाप्रमाणेच मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालाही शिवसेनेने सुरुवातीच्या टप्प्यात विरोध केला होता. तिथेही सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्रिपद शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. पुढच्या टप्प्यात शिवसेनेचा विरोध मावळल्याचे दिसून आले. या संदर्भात फडणवीस म्हणाले, समृद्धी महामार्गाच्या विरोधात अनेक ग्रामपंचायतींनी ठराव केले होते. सरकारने त्यांना महामार्गाचे फायदे समजावून दिले. आमच्या मित्रपक्षालाही राजी केले. त्यांनीही मान्य केले होते.

 

सभागृहात शिवसेनेचा दुटप्पीपणा
शिवसेनेचे आमदार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या आसनासमोर येऊन नाणारविरोधी घोषणाबाजी करत होते. त्याच वेळी शिवसेनेचे मंत्री मात्र आसनावर बसून शासकीय कामकाजाला पाठिंबा देत होते. हे पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार जयंत पाटील यांनी शिवसेनेने हा विरोधाभास थांबवावा, अशी मागणी अध्यक्षांकडे केली.

 

बातम्या आणखी आहेत...