आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DHULE CRIME: राईनपाडा हत्याकांड: खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल- मुख्यमंत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- साक्री (जि.धुळे) तालुक्यातील राईनपाडा येथे पोरधरी असल्याच्या संशयावरून पाच जणांची जमावाकडून निर्घृण हत्या करण्‍यात आली. हत्याकांडाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) सांगितले.

 

मुख्यमंत्री नागपुरात बोलत होते. अशा घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. तसेच राज्यभरात जागरुकता कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सायबर सेलद्वारे अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न सुरु करण्‍यात आल्याचे त्यांना सांगितले.

दरम्यान, हत्याकांडात मृत पावलेल्या पाच जणांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. ही घटना महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारी नाही, असेही ते म्हणाले.

 

मृतदेह ताब्यात घेणार नाही- कुटुंबिय
या प्रकरणातील आरोपींना अटक करून कठोर शिक्षा होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृतांच्या कुटुंबीयांनी घेतली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने सुमारे दीड तास चर्चा करत त्यांची समजूत काढली. प्रत्येक मृताच्या वारसांना मदत, प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी व भिक्षुक समाजाला संरक्षण देण्याचे लेखी आश्वासन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले, तर मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये केली.

 

प्रशासनाच्या लेखी अाश्वासनावर समाधान झाल्यानंतर पाचही पीडित कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतले. या सर्वांना तीन रुग्णवाहिकांमधून मृतदेहांसह त्यांच्या मूळ गावी मंगळवेढ्याकडे पाठवून देण्यात अाले. त्यानंतर सायंकाळी पिंपळनेरनजीक वस्तीला असलेल्या या कुटुंबीयांच्या नातलगांनी त्यांचा झाेपड्यांमधील संसार गुंडाळून ट्रकमधून गावाकडे नेला. दरम्यान, पाच जणांची हत्या करणाऱ्या जमावापैकी २६ जणांना पाेलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची काेठडीही सुनावली अाहे. रविवारी झालेल्या या भीषण हत्याकांडानंतर संपूर्ण गावच सुन्न झाले हाेते. साेमवारीही राईनपाड्यात अघाेषित संचारबंदी हाेती.

 

या मागण्या मंजूर
- आरोपींवर कठोर कारवाई व्हावी
- एसआयटीद्वारे चौकशी करावी
- गुन्ह्यात सरकार पक्षाची बाजू अॅड. उज्ज्वल निकम यांनी मांडावी
- मृतांच्या वारसांना सानुग्रह मदत व शासकीय नोकरीत समावेश करावा
-  राज्यात भिक्षेसाठी कोणत्याही जिल्ह्यात गेलेल्या गोसावी समाजाला स्थानिक पातळीवर पोलिस मदत करावी
- संबंधित घटना ज्या ग्रामपंचायत कार्यालयात घडली येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करणार

 

राईनपाडा गावाला शाप
अत्यंत निर्दयी हत्या झाल्याने हतबल झालेले पाच जणांच्या कुटुंबीयांचा आक्रोश थांबत नव्हता. गाव सोडून जातानाही 'आता जगून काहीच फायदा नाही' अशा भावना ते व्यक्त करत होते. आमच्या माणसांना मारल्याने या गावातील नागरिक कधीही सुखी राहणार नाही व तेथे पाऊसही कधी पडणार नाही, असा शाप या कुटुंबातील महिला देत होत्या.
 
स्थानिकांचा मदतीचा हात
पिंपळनेर येथील गावकऱ्यांनी लाेक वर्गणी करून १५ हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम गोळा करुन पीडित कुटुंबांना गावी जाण्यासाठी दिली. धुळे येथील बाप्पा सेल्सचे उमेश महाजन व प्रशांत बागूल यांनीही पंधरा हजार रुपयांची मदत केली. तसेच पालकमंत्री दादा भुसे यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. दरम्यान, पीडितांच्या नाथडवरी समाजातील पदाधिकाऱ्यांनी साेमवारी मंगळवेढ्याहून पिंपळनेरमध्ये धाव घेतली हाेती. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पीडितांना मदतीसह काही मागण्या मांडल्या. 

 

बातम्या आणखी आहेत...