आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी भिडेच नाही, तर संविधानाविरोधात वागणाऱ्यांवर बंधने आणू; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- वढू येथील संभाजी महाराजांचे स्मारक आणि कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसराच्या विकासासाठी शासन निर्णयाच्या पलीकडे जाऊन 25 कोटींपेक्षा अधिक निधी लागला तरी तो देण्यात येईल, याची हमी देतानाच संभाजी भिडेच नाही, तर संविधानाच्या विरोधात वागणाऱ्या कोणावरही बंधने आणली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

कोरेगाव भीमा दंगलीच्या चौकशीबाबत शरद रणपिसे, भाई जगताप, जनार्दन चांदूरकर, प्रा. जोगेंद्र कवाडे आदींनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावरील चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक बाबी स्पष्ट केल्या.

 

एल्गार परिषदेशी नक्षलवाद्यांचा संबंध असण्याबाबत नेमकी काय स्थिती आहे, या संबंधात नागपूरपासून मुंबईपर्यंत अनेकांना अटक करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाची सद्य:स्थिती काय आहे, असे नीलम गोऱ्हे यांनी विचारले. त्यावर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. पोलिस विहित कालावधीत आरोपपत्र दाखल करतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कोरेगाव भीमा प्रकरणाशी संबंध नसलेल्या अनेकांना अटक करण्यात आली, याकडे कपिल पाटील यांनी लक्ष वेधले. एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या अनेकांचे सक्रिय नक्षल्यांशी संबंध असल्याचे थेट पुरावे मिळाले आहेत. एक नाही, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कोरेगाव भीमा घटनेसंदर्भात तपासाचे निष्कर्ष नेमके काय आहेत? असा प्रश्न सुनील तटकरे यांनी केला. या प्रकरणातील पीडितांना नऊ कोटींची मदत यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. चौकशी सुरू असल्याने निष्कर्ष आताच सांगता येणार नाही.   

शरद रणपिसे यांनी 31 जुलैपूर्वी अहवाल न्यायालयीन चौकशी आयोगाकडून मागवणार काय? असा सवाल केला. त्यावर मुदत 15 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे त्यानंतरच अहवाल मागवता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या सदस्यांनी संभाजी भिडे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी वेलमध्ये येऊन घोषणा देणे सुरू केल्याने सभापतींनी दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.

 

याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी पूजा सकटची हत्या झाली. त्यासंदर्भात सदस्यांनी उपप्रश्न विचारले. त्यावर सुरेश सकट यांचा घरासंदर्भात पूर्वीपासून काही जणांशी वाद होता. पूजाची हत्या झाली नसल्याचे सकृतदर्शनी पुराव्यांवरून निदर्शनास आले आहे. ती घटनेची प्रत्यक्षदर्शी नसून जयदीप सकट हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. पूजाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयावरून दोन जणांना अटक करण्यात आली असून कोणाचीही गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.     
 
भिडेंचे आंबे आणि जगतापांचे काजू   
आंबा खाऊन मुले होतात, असे संभाजी भिडे म्हणाले होते. आंबे खाऊन मुली होतात, असे ते का म्हणाले नाहीत, असा सवाल विद्या चव्हाण यांनी केला. म्हणजे मुलींना त्यांचा विरोध आहे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विद्या चव्हाण यांच्या या प्रश्नावर सभागृहात खसखस पिकली. भिडेंच्या आंब्यांवर काँग्रेसचे भाई जगताप यांनी काजूचा उतारा दिला. "आंबे आंबे काय करताय, आमच्या कोकणात या, काजू दाखवतो. आंब्यांपेक्षा काजू चांगले आहेत', असे भाई जगताप म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला.

 

बातम्या आणखी आहेत...