आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई, Flipkartवरून शस्त्रे विकणाऱ्या 16 कंपन्यांवर गुन्हे- CM

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- औरंगाबादमध्ये काही समाजकटंकांनी धार्मिक तेढ निर्माण करून दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने 24 तासांत दंगल आटोक्यात आणली. मात्र, आजही काही जण समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम सुरू आहे. तसेच फ्लिपकार्टवरून शस्त्रे विकणाऱ्या देशाच्या विविध भागांतील 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल केले असून शस्त्रे पोहोचवणाऱ्या 12 जणांना अटक केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

 

विरोधी पक्षातर्फे नियम 293 अन्वये राज्यातील विविध समस्यांवर चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेत औरंगाबादमध्ये झालेल्या दंगलीबाबत सरकारला विरोधी पक्षाने जाब विचारला होता. या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले, औरंगाबादचा इतिहास पाहता तेथे सुरू झालेली दंगल लवकर आटोक्यात येत नाही. या वेळी झालेल्या दंगलीतही दोन्ही समाजांतील लोक समोरासमोर आले होते. दंगल सुरू होताच मोठ्या प्रमाणावर पोलिस कुमक पाठवण्यात आली. पोलिसांनी त्वरित दंगल आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. दोन्ही समाजांच्या नेत्यांना एकत्र आणले. त्यांच्याशी चर्चा केली आणि २४ तासांत दंगल आटोक्यात आणली. मात्र, या दंगलीत दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्वरित समाजकटंकांना अटक करून 16 दखलपात्र आणि एक अदखलपात्र गुन्हा नोंदवला. या दंगलीत 17 पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले असून एक पोलिस अधिकारी गंभीर जखमी असून तो अजूनही नोकरीवर येण्याच्या स्थितीत नाही. पोलिसांनी एकूण 71 आरोपींना अटक केली आहे.

 

नुकसानग्रस्तांना भरपाई, फ्लिपकार्टच्या कंपन्यांची चौकशी
या दंगलीत बहुसंख्य समाजाचे पाच कोटी 17 लाख, तर अल्पसंख्याक समाजाचे चार कोटी 19 लाख रुपयांचे नुकसान झाले, तर नऊ कोटी रुपयांचे  खासगी नुकसान झाले, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यासाठी एक उपसमिती तयार करण्यात आली आहे. उपसमितीचा अहवाल आल्यानंतर नुकसान भरपाई दिली जाईल. या दंगलीत फ्लिपकार्टवरून शस्त्रे विकत घेतल्याचेही समोर आले, असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, फ्लिपकार्टवर एकूण 42 शस्त्रे खरेदी करण्यात आली. इन्स्टाकार्ट प्रा.लि. ही कंपनी ही शस्त्रे डिलिव्हर करणार होती. परंतु पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी डिलिव्हरी थांबवली आणि शस्त्रे जप्त केली. याप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर शस्त्रे विकणाऱ्या कंपन्या दिल्ली, मुंबई, जामनगर, अमृतसर आदी देशाच्या विविध भागांतील आहेत. या 16 कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
राईनपाडा मृतांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन  
धुळे येथील राईनपाडा येथील झालेल्या हत्याकांडाचा तपास सुरू असून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या परिवारातील सदस्यांचे पुनर्वसन राज्य सरकार करणार असून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. तसेच हे संपूर्ण प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे यासाठी उच्च न्यायालयाला विनंती करण्यात येईल, असे उत्तर याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  सिडको भूखंड घोटाळ्याबाबत मुख्यमंत्र्यांचे नाव आल्याने त्यांनी राजीनामा द्यावा आणि भूखंड खरेदी रद्द करावी, अशी मागणी विरोधकांनी चर्चेदरम्यान केली. याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, केवळ एकच नव्हे, तर सर्व 200 प्रकरणे रद्द करावी लागतील. याबाबत विधि आणि न्याय विभागाचे अभिमत मागवू आणि सर्व प्रकरणे रद्द करण्याचा निर्णय घेऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...