आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींप्रमाणे खोटी आश्वासने नाही, तर तुम्हाला भरवसा देण्यासाठी आलोय - राहुल गांधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांत देशातील शेतकऱ्यांसह सर्वांचाच भरवसा तोडला. मोदींचे मार्केटिंग देशातले १५-२० उद्योगपती करत आहेत. त्यामुळे भाजपचे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांना विपन्नावस्थेतून बाहेर काढू शकत नाही. त्यांची नियतच नाही. मोदींप्रमाणे मला खोटी आश्वासने द्यायची नाहीत. तुम्हाला भरवसा देण्यासाठी आलो आहे. मला मनापासून शेतकऱ्यांना मदत करायची आहे,’ असे आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केले.


चंद्रपूर जिल्ह्यातील नांदेड या गावातील एचएमटी तांदळाचे जनक कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांचे राहुल गांधींनी घरी जाऊन सांत्वन केले. यानंतर या गावातच त्यांनी छोटेखानी सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधला.  राहुल म्हणाले,  “तांदळाच्या अनेक जाती शोधून शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या व असंख्य पुरस्कार मिळवणाऱ्या खोब्रागडेंना सरकारने मदत केली असती तर लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला असता. मात्र, सरकार उद्योगपतींसाठीच काम करते आहे.

 

नीरव मोदीला ३५ हजार कोटी रुपये दिले. तो पळून गेला. त्याने किती लोकांना रोजगार दिला? देशातील सारा पैसा उद्योगपतींकडे जातोय. मोदींचे मार्केटिंग देशातील १५-२० उद्योगपती करत आहेत. पण, यातून नेमका किती लोकांना रोजगार मिळतोय, हा खरा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास दर मिळत नाही. मोदींनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत. पंतप्रधानांचे काम देशाला दिशा देण्याचे आणि भरवसा देण्याचे आहे.

 

मात्र, मोदी खोटेच बोलण्याचे काम करतात. नोटबंदी, गब्बरसिंग टॅक्ससारखे निर्णय घेऊन  त्यांनी चार वर्षात शेतकऱ्यांसह साऱ्यांचाच भरवसा तोडला आहे. पंजाब, कर्नाटकमधील आमच्या सरकारने कर्जमाफी केली. देशात पैशाची कमतरता नाही. तुमची नियत कशी आहे, यावर सारे अवलंबून आहे. भाजपची नियत साफ नाही, असे राहुल म्हणाले. जगात पेट्रोलचे दर कमी होत असताना देशात वाढताहेत. आम्ही पेट्रोल-डिझेलला जीएसटी लागू करण्याची मागणी केली. मात्र, ती त्यांना मान्य नाही. रोजगार, शेतकऱ्यांची अवस्था, शिक्षण आणि ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य हे देशातले महत्त्वाचे प्रश्न असल्याचे राहुल गांधी यांनी या वेळी सांगितले.     


२०१९ पर्यंत पकोडेच विकावे लागणार

शेतकऱ्यांसाठी तुमचा अजेंडा काय आहे, आम्हाला पकोडेच विकावे लागणार की काय, असा सवाल राहुल खोब्रागडे या युवकाने राहुल गांधी यांना केला. त्याला उत्तर देताना राहुल गांधी यांनी “२०१९ पर्यंत तुम्हाला पकोडेच विकावे लागणार’ असे उत्तर दिले. देशातील १५ उद्योगपतींचे अडीच हजार लाख कोटींचे कर्ज पंतप्रधान मोदींनी माफ केले. मात्र, त्यांच्याकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पैसा नाही, अशी टीका राहुल यांनी केली. 

 

खाेब्रागडे कुटुबीयांंना साडेआठ लाखांची मदत     
राहुल गांधी यांनी या वेळी दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. काँग्रेसच्या वतीने एकत्रित स्वरूपात सुमारे साडेआठ लाख रुपयांची आर्थिक मदत खोब्रागडे यांना देण्यात आली. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचे आश्वासन माजी खासदार नरेश पुगलिया यांनी दिले. शेतकऱ्यांशी संवाद साधण्यापूर्वी सभेत दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 

राहुल गांधींनी २.४५ मिनिटांतच अाटाेपली पत्रकार परिषद

 मुंबई - दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बुधवारी येथे पावणेतीन मिनिटांचीच पत्रकार परिषद झाली. त्यांनी आगामी २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील विरोधी पक्षांच्या संभाव्य महाआघाडीच्या मुद्द्याला बगल दिली. भाजप, नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर मात्र जोरदार टीका केली. मुंबईत उशिरा पाेहोचल्याने त्यांनी ही पत्रकार परिषद आटोपती घेतली. केवळ २ मिनिटेच भाष्य केले. सर्वांचे आभार मानून उशीर झाल्यामुळे त्यांनी काढता पाय घेतला.
 

पुढील स्लाइड्‍सवर  क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...