आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राईनपाडासह इतर घटनांची SIT चौकशी व्हावी; विधान परिषदेत धनंजय मुंडे-गोऱ्हे यांच्यात चकमक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून राईनपाडासह अलीकडच्या काळात घडलेल्या अशा प्रकारे सर्व घटनांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राईनपाडा येथील हत्याकांडाविषयी उपस्थित अल्पकालीन चर्चेदरम्यान बोलताना केली.

 

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे अफवांमुळे बळी गेलेल्या पाच जणांच्या मृत्यूप्रकरणी बुधवारी नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चा सुरू करण्यात आली. या चर्चेत बोलताना मुंडे यांनी राज्य सरकारवर टीका केली.  

 

पाच जणांच्या कुटुंबांना 25 लाख रुपयांची मदत करून त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी दिली पाहिजे, अशी मागणीही मुंडे यांनी केली. आज मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक मीडियापेक्षा सोशल मीडिया वरचढ झाला आहे. एका क्षणात खातरजमा न करता बातमी पसरते. त्यामुळे साेशल मीडियावरून अफवा पसरू नये, यावर प्रतिबंध घालणारा  कायदा करण्यात यावा, अशी मागणी मुंडे यांनी केली.    

 

चुकीचा संदेश जाऊ नये  
कपिल पाटील यांनी केवळ अफवांमुळे हे बळी गेले असे मानायला मी तयार नाही, असे चर्चा प्रारंभ करताना सांगितले. सोशल मीडियांचे अफवांचे बळी म्हणून हे प्रकरण सोडून देता कामा नये, असे पाटील स्पष्ट केले. समूहाने केलेली हत्या पचू शकते, असा संदेश या नाथपंथी डवरी समाजाच्या हत्येने गेला आहे. भटक्या विमुक्तांच्या पुनर्वसनाचे कार्यक्रम गेल्या 60 वर्षांत अपयशी ठरले. सरकारने या प्रकरणी कठोर भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व समाजांची जातगणना झाली पाहिजे. भिक्षुकी वाट्याला आलेल्या समाजाला त्यातून सक्तीने बाहेर काढायला हवे, असे पाटील यांनी स्पष्ट केले. पोलिसांच्या लेखी भटक्या जाती-जमातींची अजूनही गुन्हेगार म्हणून नोंद आहे. या बाबत पोलिसी मानसिकता बदलली पाहिजे.   

या चर्चेत नीलम गोऱ्हे यांनी सोशल मीडियावर अफवा फॉरवर्ड करणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. रामहरी रूपनवर, चंद्रकांत रघुवंशी, नागो गाणार आदींनी या चर्चेत सहभागी होत मते मांडली. तूर्तास ही चर्चा मंत्र्यांच्या उत्तरासाठी राखून ठेवण्यात आली आहे.    

 

गोऱ्हे-मुंडे यांच्यात चकमक  
या अल्पकालीन चर्चेदरम्यान दुसऱ्या क्रमाकांवर उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांचे नाव पुकारले. त्या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चर्चेत त्यांचे नाव दुसऱ्या क्रमाकांवर असल्यामुळे त्यांना बोलू द्यावे, अशी मागणी केली. त्यावरून सभागृहाचे कामकाज नेमके कोणत्या नियमानुसार चालावे, यावर खल झाला. "तुम्हाला मला बोलू द्यायचे नाही', असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी मुंडे यांच्यावर केला. "सदनाच्या दोन सदस्यांत अशा प्रकारे गैरसमज होत असेल तर कामकाजाला अर्थ राहत नाही. ताईंना मी कशाला थांबवू', असा सवाल मुंडे यांनी केला. त्यानंतर उपसभापतींनी मुंडे यांना बोलण्यास सांगितले.

बातम्या आणखी आहेत...