आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CANCER रुग्णांना दिलासा, राज्यातील 11 जिल्हा रुग्णालयांत मिळणार मोफत केमोथेरपी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नाशिक, जळगाव, अकोला, अमरावतीसह राज्यातील 11 जिल्हा रुग्णालयांत टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत केमोथेरपी उपलब्ध करून देण्यात येणार असून याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. कर्करोगावरील उपचारांमध्ये महत्त्वाची असणारी केमोथेरपी जिल्हा रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे काय, असा तारांकित प्रश्न मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी विधानसभेत विचारला होता.

 

या प्रश्नाबाबत दिलेल्या लेखी उत्तरात आरोग्य विभागाने म्हटले आहे की, गडचिरोली, अमरावती, पुणे, जळगाव, रत्नागिरी, नाशिक, भंडारा, सातारा, वर्धा, अकोला, नागपूर या 11 जिल्ह्यांतील जिल्हा रुग्णालयांत टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने केमोथेरपी युनिट चालू करण्याचे ठरवण्यात आले असून, याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. तसेच राज्यातील  उर्वरित जिल्ह्यांमध्येसुद्धा टप्प्याटप्प्याने असे युनिट सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.   

 
मुंबई शहरात गर्भनिरोधक शस्त्रक्रियेमुळे 5 वर्षांत 24 महिलांचा मृत्यू   
मुंबई शहरात कुटुंब नियोजनासाठी केल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक शस्त्रक्रियेमुळे गेल्या 5 वर्षांत 24 महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत लेखी उत्तरात दिली. आमदार आशिष शेलार यांनी यासंदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.  उत्तरात मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली की, 2010 पासून मुंबईतील जिल्हास्तरीय गुणवत्ता अभिवचन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीतर्फे प्रत्येक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मृत्यू प्रकरणाची विस्तृत चौकशी करण्यात येते. शस्त्रक्रिया करताना सर्व शासकीय व निमशासकीय संस्थांच्या सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी मार्गदर्शक सूचना, शासकीय परिपत्रके सर्व संबंधित रुग्णालयांना देण्यात आली आहेत. मृत्यू झालेल्या महिलांच्या वारसदारांना 2013-14 मध्ये 10.50 लाख, 2015-16 मध्ये 6.50 लाख, 2016-17 मध्ये सहा लाख आणि 2017-18 मध्ये चार लाख  इतकी आर्थिक मदत करण्यात आलेली आहे. तसेच स्त्री नसबंदी शास्त्रक्रिया केल्यानंतर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रोत्साहन म्हणून दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती/जमातीतील स्त्री लाभार्थींना 600 रुपये व दारिद्र्यरेषेवरील महिलांसाठी 250 रुपये देण्यात येतात.   
 
15 वर्षांखालील 2430 मुलांना क्षयाची लागण   
 राज्यात जानेवारी ते एप्रिल 2018 या कालावधीत 15 वर्षांखालील 2430 मुलांना क्षयरोगाची लागण झाली असून यातील 603 बालके मुंबई जिल्हा आणि 440 बालके ठाणे व पालघर जिल्ह्यातील असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सोमवारी विधानसभेत लेखी उत्तरात देण्यात आली.   

 

मुंबई, ठाणे, पालघर या तीन जिल्ह्यांत क्षयरोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले काय? असा प्रश्न आमदार आशिष शेलार यांनी विचारत सरकार याबाबत करत असलेल्या उपाययोजनांची माहितीही तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून मागितली होती. यास आरोग्य विभागाकडून दिलेल्या लेखी निवेदनानुसार, राज्यात दरवर्षी सुमारे 1 लाख 75 हजार नव्या क्षयरुग्णांची नोंद होत असते, बालकांसाठी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत लहान मुलांमधील क्षयरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही योजना राबवण्यात येत आहेत. क्षयरोगबाधित रुग्णांच्या संपर्कात असणाऱ्या सर्व व्यक्तींची व कुटुंबातील बालकांचीही तपासणी केली जाते तसेच रुग्णांना मोफत औषधोपचार करून रुग्ण शोधण्याची मोहीम सतत सातत्याने सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...