आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गडचिराेलीच्या जंगलात नक्षलींना घेरून मारले; नदीत उड्या मारलेल्यांचाही खात्मा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- गडचिराेली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कसनासूर- बोरियाच्या जंगलात रविवारी सकाळी  दैनंदिन कामात व्यग्र असलेले नक्षलवाद्यांना सी-६० पथके आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पथकाने दाेन पथकाने घेरुन मारले. शिबिरावर अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पुरते घाबरलेल्या नक्षलींनी वाट दिसेल तिकडे त्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने पाठलाग करुन त्यांचा खात्मा केला. यात  काही जण घटनास्थळीच ठार झाले, तर अनेकांनी जखमी अवस्थेतच बाजूच्या इंद्रावती नदीच्या पात्रात उड्या टाकून पलीकडच्या छत्तीसगडच्या भागात पलायनाचा प्रयत्न केला. मात्र, त्यात काहींनाच यश अाले व बाकीच्यांना जलसमाधी मिळाली. 


रविवारी कसनासूर-बोरियाच्या जंगलातील पोलिस आणि नक्षलवाद्यांमधील सामना ही पूर्णपणे चकमकच होती, असा दावा गडचिरोली पोलिसांकडून केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात बेसावध नक्षल दलमकडून फारसा प्रतिकारच झाला नाही, असा अंदाज घटनास्थळावर आढळून आलेली सामग्री व परिस्थितीवरून येत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. घटनास्थळी सापडलेली नक्षलवाद्यांकडील मोजक्या अत्याधुनिक बंदुका वगळता (दोन एके ४७ आणि २ एसएलआर) इतर शस्त्रे कुचकामी होती. या ठिकाणी अन्नाची अर्धवट भरलेली भांडी, उपम्याची अर्धवट पाकिटे, औषधांची पाकिटे, पेन ड्राइव्हज, साबणांच्या केस, वापरण्यात आलेल्या साबणा, दाढीचे बाहेर काढण्यात आलेले सामान, टूथपेस्ट, ब्रश या साहित्याचा अक्षरश: सडा पडलेला होता. नक्षलवाद्यांकडून वापरल्या जाणाऱ्या बारा बोअरच्या बंदुकांच्या रिकाम्या काडतुसांचे प्रमाणही अत्यल्प आढळून आले. मृतावस्थेत आढळून आलेल्या महिला नक्षलींपैकी अनेकांच्या अंगावर अर्धवट कपडे होते. त्यामुळे बरेचसे नक्षलवादी अंघोळीत व्यग्र होते, तर एका बाजूला स्वयंपाकाचे काम सुरू असावे, असा कयास लावण्यात येत आहे. नेमक्या याच क्षणाला पोलिसांकडून तीन बाजूंनी गोळीबार सुरू झाल्याने नक्षलवाद्यांना पळता भुई थोडी झाली. या हल्ल्यात अनेक नक्षलवादी घटनास्थळावर ठार झाले, तर अनेकांनी जखमी अवस्थेतच इंद्रावतीत उड्या टाकल्या.

 
इंद्रावती नदीच्या पलीकडे किमान दोन ते तीन किलोमीटर अंतरावर छत्तीसगड राज्याची दुर्गम अशी सीमा सुरू होते. मात्र, जखमा गंभीर असल्याने नदीचे पात्र ओलांडणे अनेकांना शक्य झाले नाही, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी सकाळपर्यंत कुजून पाण्यावर आलेले  तब्बल १५ नक्षलींचे मृतदेह आढळून आले. चकमकीनंतर काही वेळातच या परिसरात जोरदार धो-धो पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे जखमी नक्षलींच्या अडचणींत आणखी भर पडल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याच वेळी पावसामुळे चकमकस्थळावरील सी-६० पथक आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनादेखील रात्री उशिरापर्यंत परिसर सोडणे अशक्य झालेे. गडचिरोलीहून निघालेला केंद्रीय राखीव दलांचा अतिरिक्त ताफा सोमवारीच चकमकस्थळावर पोहोचू शकला. दुपारनंतर इंद्रावतीतील मृतदेहांची पुसटशी कल्पना या पथकांना आली, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

 
हुशार नंदू भरकटला, नक्षलवादी बनला  
अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला येथील चकमकीत ठार झालेला नक्षलींच्या जिल्हास्तरीय समितीचा सदस्य नंदू उर्फ वासुदेव मेश्राम हा हुशार विद्यार्थी होता. नंदूचे बारावीपर्यंतचे शिक्षण पेरिमिली येथील आश्रमशाळेत झाले होते. २००१-२००२ मध्ये बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत तो शाळेतून प्रथम आला होता. मात्र, त्यानंतर तो नक्षलवादी चळवळीकडे ओढला गेला व सोमवारी त्याचा शेवट झाला.

 

पाेलिसांकडे अद्ययावत शस्त्रे व इतर साधने  
या चकमकीत पोलिस दलाकडून स्वयंचलित बंदुकांचा वापर झाल्याचे सांगण्यात येत अाहे. अलीकडच्या काळात नक्षलविरोधी अभियानातील पथकांना ग्रेनेड लाँचर्स, थर्मल इमेजर्स, नाइट व्हिजन दुर्बिणी, बुलेटप्रूफ हेल्मेट आणि जाकिटेही पुरवण्यात आली आहेत. दरम्यान, पोलिसांनी नक्षलवाद्यांवर चहुबाजूंनी दबाव वाढवला आहे. नक्षलवाद्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना आत्मसमर्पण करण्यास तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चळवळीचे कंबरडेच मोडल्याने येत्या काळात नक्षलवाद्यांमध्ये आत्मसमर्पणाचे प्रमाण वाढेल, असा पोलिसांना विश्वास वाटत आहे.  

 

नक्षलवाद्यांना पळता भुई थोडी..  
या अभूतपूर्व यशाने उत्साहित झालेल्या गडचिरोली पोलिसांनी संपूर्ण परिसरातील नक्षलविरोधी अभियानाचा वेग आणखी वाढवला आहे. गडचिरोलीहून अतिरिक्त फौजफाटा पाठवून अहेरी, भामरागड, सिरोंचा तसेच धानोरा तालुक्यांचा परिसर अक्षरश: पिंजून काढण्यात येत असल्याने नक्षलवाद्यांना पळता भुई थोडी झाली आहे. या परिसरातील गावांमध्ये जाऊन पोलिस नक्षलवादी कुठे लपले आहे काय? याचा कसून तपास करत अाहेत. विशेष म्हणजे पोलिसांच्या कारवाईला स्थानिकांचेही मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत आहे. स्थानिक लोकांकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारेच रविवारची पहिली माेहीम सुरक्षा दलांना फत्ते करता आली, असे पोलिसांचे म्हणणे आहे.  

 

हेही वाचा,
गडचिरोलीत पोलिसांनी दोन दिवसांत ३७ नक्षलवादी टिपले

 

 

बातम्या आणखी आहेत...