आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरचा मोस्ट वॉंटेड डॉन संतोष आंबेकरची शरणागती, दोन वर्षांपासून होता फरार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- उपराजधानीतील गुन्हेजगताचा डॉन आणि नागपूर पोलिसांसाठी मोस्ट वॉंटेड ठरलेला कुख्यात संतोष आंबेकर याने अखेर आज (गुरुवार) प्रथम श्रेणी न्यायालयापुढे आत्मसमर्पण केले. कुख्यात गुंड बाल्या गावंडे खून प्रकरणात आरोपी असलेला आंबेकर हा मागील दोन वर्षांपासून फरार होता. त्यामुळे नागपूर पोलिस टीकेचे लक्ष्य बनले होते.

 

खून, दरोडा, खंडणीचे असंख्य गुन्हे दाखल असलेला संतोष आंबेकर दोन वर्षापूर्वी नागपुरात घडलेल्या बाल्या गावंडे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार होता. प्रतिस्पर्धी ठरू पाहणाऱ्या बाल्या गावंडे याचा आंबेकरच्या इशार्‍यावरून खून करण्यात आल्याचे कळमना पोलिसांच्या तपासात उघड झाले होते.  मात्र, पोलिस कारवाईची माहिती मिळताच तो फरार झाला. या प्रकरणात दोषारोपपत्रही दाखल झाले होते.

 

पोलिसांनी फरार संतोष आंबेकरची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया गेल्याच महिन्यात सुरु केली होती. त्यामुळे संतोषने गुरुवारी दुपारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकार्‍यांपुढे शरणागती पत्करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. यावेळी त्याचे काही साथीदारही त्याच्यासोबत होते.

 

न्यायालयात हजर झाल्यावर त्याची न्यायालयाच्या आदेशान्वये कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, बाल्या गावंडे खून प्रकरणात चौकशीसाठी पोलिस त्याला उद्या ताब्यात घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संतोषच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्याच्यावर आतापर्यंत चारदा मोक्काअन्वये कारवाई झाली आहे. सातत्याने फरार होत असलेल्या संतोषला यापूर्वी अनेकदा नाट्यमयरित्या अटक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...