आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात विजेचे २ बळी; नागपुरात शाळांना सुटी, पिपळ्यामध्‍ये 450 विद्यार्थ्‍यांना शाळेतून बाहेर काढण्‍यात यश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नागपूरसह संपूर्ण विदर्भात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी सुखावला असला तरी सामान्य माणसाचे मात्र हाल झाले. हवामान खात्याने विदर्भात ८ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. संपूर्ण नागपूर जिल्ह्यातही अतिवृष्टीची शक्यता दिल्याने शनिवारी शाळांना सुटी जाहीर करण्यात अाली. येथील आदर्श संस्कार शाळेत अडकलेल्या १५० विद्यार्थ्यांना एनडीआरएफने सुखरूप बाहेर काढले.         


नागपुरात रामटेकजवळील पिंडकेपार येथील हर्षल काशिनाथ चनेकर (वय १७) व नागेश्वर हंसाराम मोहुर्ले (वय-१८) यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. तर रामटेक तालुक्यातील मुखनापूर येथील एक ३६ वर्षीय व्यक्ती पुरात वाहून गेली. गोंदियातील बाई गंगाबाई शासकीय रुग्णालयातील प्रसूती वाॅर्डात गुडघ्याएवढे पाणी साचल्याने रुग्णांची तारांबळ झाली.

 

पावसात व्‍यवस्‍था गेली वाहून

'सर आली धावून आणि व्यवस्था गेली वाहून', अशी गत नागपुरात आलेल्या  मुसळधार पावसाने प्रशासनाची करून टाकली. शुक्रवारी सकाळी 8.30 ते 11.30 या 3 तासांत 162.7 MM इतका भीषण पाऊस झाल्यामुळे नागपूर जलमय झाले होते. या पावसामुळे ऐन अधिवेशनात महापालिकेची इज्जत पावसाच्या पाण्यात वाहून गेली. 

 

गुरुवार 5 जुलैच्या रात्रीपासूनच नागपुरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी दुपारपर्यंत संततधार असल्याने पावसाने जराही उसंत घेऊ दिली नाही. शहराचे जनजीवन यामुळे पार विस्कळीत झाले. उंच, सखल आणि खोलगट भागात गुडघाभर पाणी साचले. नंदनवन, जयप्रकाशनगर, सोमलवाडा आदी अनेक भागांत घरांमध्ये पाणी शिरले, तर रस्त्यांवर तळे साचल्याने त्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एनडीआरएस व एसडीआरएसला पाचारण करण्यात येणार असून येत्या 24 तासांतही मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता उद्या शनिवारी शाळांना सुटी देण्याची सूचना देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी 'दिव्य मराठी'ला दिली. वर्धा रोडवर तसेच विमानतळ परिसरात पाणी साचल्याने परिसराला तलावाचे स्वरूप आले होते. त्यामुळे काही काळ हा परिसर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.  
 
मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन घेतली माहिती   
नागपूर महानगरपालिकेत असलेल्या "स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर'ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने तुंबलेल्या जागांची पाहणी केली. आपत्कालीन यंत्रणा तातडीने कामाला लावण्याचे निर्देश दिले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी,  प्रधान माहिती सचिव एसपीआर श्रीनिवासन, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल,   मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह, स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे उपस्थित होते.  
 
वीज पुरवठा केला खंडित   
अतिवृष्टीमुळे खोलगट भागात पाणी साचल्याने तसेच वीज वितरण यंत्रणा पाण्यात असल्याने नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. महावितरणचा कुठेही तांत्रिक बिघाड नव्हता. नागरिकांच्या सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून वीज पुरवठा बंद करण्यात आला होता, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले. शहरातील काँग्रेसनगर विभागातील 40 टक्के भाग बंद करण्यात आला होता. पाण्याची पातळी उतरताच वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा...नाग'पूर'चे फोटो...

बातम्या आणखी आहेत...