आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

POLITICS: छगन भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात विधानसभेत जोरदार खडाजंगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- सव्वादोन वर्षांनंतर प्रथमच विधानसभेत आलेले माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात सोमवारी विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. अर्थ व वन विभागावर भुजबळांच्या टीकेने संतप्त झालेल्या मुनगंटीवारांनी रुद्रावतार धारण केला. त्यामुळे त्यांना आवरण्यासाठी शेजारचे मंत्री आणि आमदारांना त्यांच्याकडे धाव घ्यावी लागली. या खडाजंगीचे पडसाद पुरवणी मागण्यांवर मुनगंटीवरांनी दिलेल्या उत्तरातही उमटले. 


वन विभागाच्या ५० कोटी वृक्ष लागवडीचा उल्लेख करताना भुजबळांनी 'वन विभागाचे अधिकारी झाडे लावण्यातच व्यग्र असल्याने गरीब आदिवासींची वनहक्क प्रकरणे प्रलंबित आहेत,' असा उल्लेख केला. भुजबळांच्या या आरोपावरच ठिणगी पडली. संतप्त मुनगंटीवारांनी उभे होऊन 'भुजबळांसारख्या अनुभवी व मंत्री राहिलेल्या व्यक्तीला वनहक्क हा वन विभागाचा विषय नाही, हे माहिती नाही का?' असा प्रश्न उपस्थित केला. 'राज्यातील जनतेचे सामान्यज्ञान बिघडवण्याचे काम भुजबळांनी करू नये. २००५ पासून हा प्रश्न कायम आहे. तुमच्या आघाडी सरकारच्या काळात काय झाले?' असेही मुनगंटीवार म्हणाले. त्यावर 'तुम्ही तरी काय दिवे लावलेत? तुम्ही विद्वान आहात. खोटे बोलूनच सत्तेवर आलात,' असे प्रत्युत्तर भुजबळांनी दिल्याने मुनगंटीवार भडकले. 'आम्हाला कोणीही येऊन शिकवू नये' असे सांगत मुनगंटीवारांनी रुद्रावतार धारण केला. ही खडाजंगी टोकाला जात असल्याचे लक्षात घेऊन शेजारी बसलेले मंत्री व आमदारांनी मुनगंटीवारांच्या आसनाजवळ जाऊन त्यांना शांत केले. त्यानंतर भुजबळांनी आपले भाषण पूर्ण केले. 


हीच आर्थिक शिस्त आहे काय तुमची : भुजबळ 
भुजबळांनी अर्थ खात्याचा कारभार नियोजनशून्य असल्याचे सांगत सुरुवात केली. 'अर्थसंकल्पीय अधिवेशन तीनच महिन्यांपूर्वी झाले असताना आता ११ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या कशा? अशा अवास्तव मागण्या का येतात? सरकारने १२ अधिवेशनांत आतापर्यंत १ लाख ६५ हजार कोटींच्या मागण्या मांडल्या आहे. हीच तुमची आर्थिक शिस्त आहे काय? राज्यावरील कर्ज वाढत आहे. महसुलात घट होत आहे,' असे सांगताना सरकारने राज्याची आर्थिक शिस्त बिघडवल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी सरकारवर या वेळी केला.

 
तुमच्या काळात काय घडले ते पाहा : मुनगंटीवार 
भुजबळांच्या आरोपांवर संतापलेले मुनगंटीवार म्हणाले. 'आम्ही १ लाख २५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या. मात्र, आघाडी सरकारने १ लाख ४० हजार कोटींच्या मांडल्या होत्या. त्यामुळे भुजबळांनी नियोजनशून्य कारभार कोणाच्या काळात होता हे सांगावे. आकडे तपासून स्वत:ला प्रश्न विचारावे. विद्यार्थ्यांचे सामान्यज्ञान बिघडणार नाही, याचीही काळजी घ्यावी. पुरवणी मागण्यांचा निधी नेमका कुठे वापरतो आहेत, हेपण लक्षात घेतले पाहिजे,' असे सांगत 'ज्यांच्यासाठी तुम्ही रेड कार्पेट टाकले ते तुमचे सन्माननीय नेते येथे नाहीत,' असा उल्लेखही मुनगंटीवारांनी राष्ट्रवादीच्या बाकांकडे पाहून केला. 

 

सिडको जमीन घोटाळ्यात काहीतरी काळंबेरं- अजित पवार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोच्या कथित जमीन व्यवहारांना स्थगिती दिली आहे. याचा अर्थ त्यात नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे, असे खोचक वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. या घोटाळ्याची महत्त्वपूर्ण दस्ताऐवज आमच्या हाती लागले आहेत. या प्रकरणात आम्ही कोणालाही सोडणार नाही, अशा इशाराही पवार यांनी दिला आहे.

 

अधिवेशन नागपुरात घेण्याचा उद्देश काय?  
हिवाळी सोडून पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याच्या मागील उद्देश काय होता, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. कोणतीही तयारी नसताना पावसाळी अधिवेशन नागपूरात घेतले. पावसाचा फटका बसून इतिहासात पहिल्यांदा विधिमंडळाची वीज गूल झाल्याने कामकाज स्थगित करण्‍या आले होते. सरकारसह नागपूर महापाकिकेचे अपयश असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...