आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबा रामदेव, रॉबर्ट वढेरा यांच्या \'जावई\'गिरीवरून गोंधळ; विरोधकांकडून जोरदार चिखलफेक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- रामदेवबाबांच्या पतंजली उद्योग समूहाला मिहानमध्ये २३० कोटी रुपये किमतीची जमीन दिली. त्यामुळे २०९ कोटींचे नुकसान झाले. रामदेवबाबा सरकारचे जावई आहेत काय, असा सवाल संजय दत्त यांनी प्रश्नोत्तरांच्या तासानंतर केला. 'त्यावर बाबा रामदेव जावई नाहीत. राॅबर्ट वढेरा मात्र जावई आहेत' असे प्रत्युत्तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. यावरून विरोधी बाकांवरील सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याला सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी गोंधळानेच उत्तर दिले. यातच सभापतींनी स्थगन नाकारला. संजय दत्त आणि मुनगंटीवार यांनी केलेले उल्लेख तपासून पाहिल्यानंतर कामकाजातून काढून टाकण्यात येतील, असे सभापतींनी जाहीर केले. 


या विषयावर २८९ खाली सर्व कामकाज थांबवून चर्चा घेण्याची मागणी संजय दत्त यांनी केली. बाबा रामदेव यांना उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तराखंडमध्ये जमीन दिली. दिलेल्या जमिनीवर ते श्रीमंतांसाठी सदनिका बांधतील. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बाबा उद्योगपती व व्यापारी भिकारी होत आहे, असा आरोप दत्त यांनी केला. 


विरोधकांनी किती जागा दिल्या ते आम्ही सांगू : गिरीश बापट 
अशी कोणतीही जागा कुणावर खप्पामर्जी होऊन राज्य सरकार देणार नाही. व्हिडिओकाॅनलाही मागील सरकारने स्वस्तात जमीन दिली होती, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी बाबा रामदेव योगक्रांती करणारे असल्याचे सांगितले. यांनी किती साखर सम्राटांना, शिक्षण सम्राटांना जागा दिल्या तेही सांगू, असे गिरीश बापट यांनी सांगितले. यानंतर झालेल्या गोंधळात सभापतींनी स्थगन नाकारला. 


कोट्यवधी रुपये किंमत असलेली जमीन रामदेवबाबांना स्वस्तात 
मिहानमध्ये रामदेव बाबांच्या पतंजली उद्योगसमूहाला २३० एकर जमीन फक्त २५ लाख रुपये एकर दराने देण्यात आली आहे. या ठिकाणी पतंजली फूड अँड हर्बल पार्क बनवणार आहे. यातून ५० हजार रोजगार निर्मिती होईल, असा रामदेवबाबांचा दावा आहे. या जमिनीची किंमत १ कोटी रुपये एकर मानली जाते. याप्रकरणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिकाही दाखल आहे. याचिकेनुसार, मिहानमध्ये दोन वेगवेगळ्या कंपन्यांसाठी वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले. रिलायन्स एअरोस्पेसला येथे ५७ लाखांच्या दराने जमीन देण्यात आली, तर पतंजलीला केवळ २५ लाखांचाच दर लावला आहे. 

बातम्या आणखी आहेत...