आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी कर्जमाफी, नुकसान भरपाई, हमीभावावर विरोधकांनी काढले सरकारचे वाभाडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- शेतकऱ्यांची कर्जमाफी, कापूस व धान उत्पादकांना नुकसान भरपाई, हमीभाव व नव्या कर्जवाटपाच्या बिकट परिस्थितीवर मंगळवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारचे वाभाडे काढले. शेतकऱ्यांच्या कुठल्याच प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याची टीका करत शेतकरी पेटून उठल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होईल, असा इशाराही विरोधी पक्षांनी दिला. 


विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, या सरकारच्या काळात ११ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. केंद्राने जाहीर केलेल्या हमीभावावर सत्तापक्षाने स्वतःची पाठ थोपटून घेतली. प्रत्यक्षात राज्याने शिफारस केलेले हमीभाव व केंद्राच्या घोषणेत मोठी तफावत असून सरकारने दीडपट हमीभावाचा कोठला हिशेब काढला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कर्जमाफीच्या नावावरही शेतकऱ्यांची फसवणूक झाली. ३० जूनपर्यंत २१ लाख शेतकऱ्यांनाच दिलासा मिळाला. शेतकरी मोजून घेणार, अशी घोषणा करणाऱ्या शिवसेनेचे राजीनामे कुठे आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला. जलयुक्त शिवार योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला. प्रत्येक जिल्ह्यात ५० ते ६० टक्के बनावट कामे झाल्याचे अंदाज आहेत. त्यामुळे या योजनेचे अॉडिट व्हावे, अशी मागणी विखेंनी केली. 


...तर अजित पवार नाव सांगणार नाही
आमच्याकडील अनेक लोक तुमच्याकडे जाऊन आमदार, मंत्री झाले. तुमच्याकडील लोक वाटच पाहत आहेत. आमची सत्ता आल्यावर हीच मंडळी पुन्हा आमच्याकडे आली नाही तर अजित पवार म्हणून नाव सांगणार नाही, असे पवार म्हणाले. 


त्या अधिकाऱ्याला फाशी द्यावी 
कर्ज देण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्याने शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करण्याचा लाजिरवाणा प्रसंग राज्याच्या इतिहासात कधी घडला नाही. सरकारने त्यावर काही ठोस कारवाई केली नाही. हा प्रकारच इतका संतापजनक असून अशा लोकांसाठी फाशीची शिक्षाच योग्य ठरते. त्यामुळे सरकारने त्यासाठी फाशीची तरतूद करणारा कायदा आणावा, अशी मागणी अजित पवार यांनी या वेळी केली. दीडपट हमीभाव हा केंद्राचा निवडणूक जुमला असून ही चक्क लबाडी असल्याचा आरोपही त्यांनी केला. 


कर्जमाफी न मिळाल्यास शेतकऱ्यांच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक : सहकारमंत्री 
कर्जमाफीला एक वर्ष पूर्ण होत आहे. आतापर्यंत ३७ लाख ७८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. मात्र, शेतकऱ्यांनी दिलेली यादी व बँकेची यादी जुळून न आल्याने आतापर्यंत ९ वेळा यादी तपासण्यासाठी परत पाठवली. कर्जमाफी न मिळाल्यास शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लवकरच एक टोल फ्री क्रमांक सुरू केले जाईल, अशी घोषणा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी विधान परिषदेत केली. 

 

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान कर्जमाफी योजनेबाबत हेमंत टकले, अमरसिंह पंडित, धनंजय मुंडे आदींनी तारांकित प्रश्न विचारला. त्यावरील चर्चेत सहकारमंत्र्यांनी ही घोषणा केली. तालुकास्तरावर सहायक निबंधकाच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे. कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्याने या समितीकडे अर्ज केल्यास त्याला कर्जमाफी मिळवून देण्यात मदत करण्यात येईल, असेही सहकार मंत्र्यांनी स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...