आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर..लवकरच प्राध्यापक भरती, घड्याळी तासिकेवरील मानधनात 18-20 हजाराने वाढ हाेणार?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राज्यात वेतनावरील खर्च नियंत्रित करण्याकरीता वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेला 25 मे 2017 रोजी घातलेली बंदी लवकरच उठविण्यात येईल. हे प्रकरण उच्चाधिकार समितीकडे पाठविण्यात आले असून लवकरच भरतीवरील बंदी उठविण्यात येईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले.

 

घड्याळी तासिकेवर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात 18 ते 20 हजार रूपये इतकी वाढ करण्याचा शासनाचा मानस असून या संबंधात वित्त विभागाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही तावडे म्हणाले. प्राचार्याची रिक्त पदे भरण्याचे आदेश यापूर्वीच 23 एप्रिलला देण्यात आल्याचे तावडे म्हणाले.

 

दूध उत्पादकांच्या आंदोलनावरील चर्चेचा स्थगन नाकारला, परिषद दोनदा तहकूब

राज्यात सध्या सुरू असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनावरील चर्चेत विरोधकांनी गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज सभापतींनी पहिल्यांदा 20 मिनिटांसाठी आणि नंतर सभापतींनी स्थगन नाकारल्यामुळे 10 मिनिटांसाठी तहकूब केले.

 

सभागृह सुरू झाल्यावर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. त्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी राज्यातील दूध आंदोलनाचा विषय मांडला. ते म्हणाले, विद्यमान सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यावर सरकारने आडमुठेपणाची भूमिका घेतली. हजारो लिटर दुधाची नासाडी होत आहे. आंदोलन केल्यास गाठ माझ्याशी आहे, असे बोलत शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला ठेवीत 289 खाली या विषयावर चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी तटकरेंनी केली. 

 

रामहरी रूपनवर यांनी शेतकरी, शेतमजूरांमध्ये सरकारविषयी नाराजी असल्याचे सांगितले. नीलम गोऱ्हे यांनी सरकारकडून गेल्याच आठवड्यात निर्णायक तोडगा अपेक्षित होता, असे स्पष्ट करत यामुळे शेतकरी विरूद्ध ग्राहक अशी तेढ निर्माण होण्यापेक्षा सरकारने अधिवेशन संपण्यापूर्वी तोडगा काढावा, अशी मागणी केली. त्यावर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उत्तर देण्यासाठी उभे राहाताच विरोधकांनी त्याला आक्षेप घेतला. राज्यमंत्री दुग्धविकास खात्याशी संबंधित असल्याचे सभापतींनी सांगितल्यानंतरही विरोधकांचा गोधळ सुरूच राहिल्याने सभापतींनी 20  मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

 

तटकरेंचा सदाभाऊंना टोला

तहकूबी नंतर सभागृह सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या भावना आणि दु:ख सभागृहात मांडण्यासाठी आम्ही चर्चेची मागणी केल्याचे मुंडे म्हणाले. काही वर्षांपूर्वी आपण याच चळवळीतून आंदोलने केली. त्या माध्यमातूनच तुम्ही विधान परिषदेपर्यत पाेहोचलात, अशी आठवण तटकरे यांनी केला. मूळच्या भूमिकेपासून आपण बाजूला गेलेले नसाल अशी अपेक्षा असल्याचा टोला सुनील तटकरे यांनी सदाभाऊ खोतांना हाणला. 

 

यावर सदाभाऊ खोत यांनी दूध प्रश्न देशभरात असल्याचे सांगितले. यापूर्वीच्या दूध आंदोलनात मी होतो. त्यावेळी दूधाची दरवाढ झाली होती. मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे राज्यमंत्र्यांनी सांगितले. त्यावर राज्यमंत्री उत्तर देत आहेत, असा आक्षेप घेत विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळात सभापतींनी स्थगन नाकारीत विषयाचे गांभीर्य लक्षात घेता नियम 97 अन्वये चर्चा घेण्याचा निर्णय दिला. त्यानंतर घोषणाबाजी सुरूच राहिल्याने सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

 

बातम्या आणखी आहेत...