आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवरायांबद्दल भाजप आमदाराच्या \'भलत्या\'च वक्तव्याने गदारोळ; आजी-माजी मुख्यमंत्र्यांत खडाजंगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- अरबी समुद्रातील प्रस्तावित स्मारकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आल्याच्या मुद्दा विधानसभेत चांगलाच तापला. 'उंची कमी करण्यात आलेली नाही' या मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणावर विरोधी पक्षांचे समाधान झाले नाही. त्यातच भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपावरून वातावरण आणखीनच तापले व भाजप विधानसभेत एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र, भातखळकरांची दिलगिरी आणि अध्यक्षांनी समज देण्याच्या सर्वपक्षीय तोडग्यानंतरच वातावरण निवळले. 


'शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मूळ आराखड्यातील उंची २५ फुटांनी कमी करण्यात येऊन तलवारीची उंची वाढवण्यात आली', असा आरोप करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वादाला तोंड फोडले. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनानंतर ही रचना बदलण्यात आली. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असून आम्ही हे सहन करणार नाही, असा इशारा चव्हाणांनी दिला. त्यांच्या आरोपांनी मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप झाला. १५ वर्षे तुम्ही काही केले नाही. आम्ही स्मारकाच्या सर्व परवानग्या आणल्या. तुम्ही आता राजकारण करू नका. पुतळ्याची उंची कुठेही कमी करण्यात आलेली नाही. हा जगातील सर्वात उंच पुतळा असेल. केंद्रीय पर्यावरण विभागाकडे केवळ संकल्पचित्र पाठवण्यात आले. पुतळा समुद्रात होणार असल्याने डिझाइन तयार करताना हवेचा दाब, लाटांचा दबाव लक्षात घेऊन अद्ययावत आराखडा तयार केला आहे. विरोधकांनी या मुद्द्यावर दिशाभूल चालवली असून यांनी आजवर गप्पाच मारल्या, असा आरोपही त्यांनी केला. मुंबईतील अनेक महापुरुषांच्या पुतळ्यांच्या व चबुतऱ्यांच्या उंचीत मोठा फरक असल्याचे त्यांनी उदाहरणांसह सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणाने समाधान न झाल्याने काँग्रेस आणि राष्टवादीच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने कामकाज तहकूब करण्यात आले. 


राजदंड पळवला
अध्यक्षांच्या आसनाजवळ गोंधळ सुरू असताना काही विरोधी आमदारांनी राजदंड पळवला. सभागृहाबाहेर जाण्यापूर्वीच तो अध्यक्षांच्या चोपदारांनी पुन्हा ताब्यात घेतला. 


भातखळकरांच्या विधानाचा वाद पेटला, नंतर व्यक्त केली दिलगिरी 
पुतळ्याच्या उंचीसंदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुद्द्यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी 'कार्यक्रमपत्रिकेप्रमाणे कामकाज न करता तुम्ही भलते विषय सभागृहात उपस्थित करता' असे म्हटले. त्यावर, भातखळकर हे मनुवादी विचारांचे आहेत. त्यांचे वक्तव्य हे शिवाजी महाराजांचा अवमान करणारे आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला. त्यावर, आपण 'भलते' हा शब्द पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी वापरला होता. तो कुणाला अवमान वाटत असेल तर मागे घेतो, असे भातखळकरांनी स्पष्ट केले. मात्र, वाद वाढतच गेला. अजित पवार यांनी वापरलेला 'मनुवादी' शब्द मागे घ्यावा वा तो कामकाजातून काढावा, अशी मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 


भाजप-शिवसेनेतच तणातणी
डिझाइनमधील बदल आम्हाला मान्य नाही, असे शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी सांगितले. शिवाजी महाराजांबद्दलचा कुठलाही विषय भलता ठरू शकत नाही. त्यामुळे भातखळकरांनी माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेनेही रेटून धरली. त्यावरून तणातणी होऊन भाजप व शिवसेना आमदार समोरासमोर येण्याचा प्रसंग उद््भवला. भाजपचे योगेश सागर शिवसेना आमदारांकडे धावून गेल्याने प्रकरण चांगलेच तापले होते. 


आमदारांनो, मोजून-तोलून शब्द वापरा : विधानसभाध्यक्ष 
अतुल भातखळकर यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह केले आहे. त्यामुळे या विधानाबद्दल त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी लावून धरली. त्यामुळे गोंधळ वाढल्याने कामकाज पुन्हा तहकूब झाले. भातखळकरांनी आक्षेपार्ह शब्दाबद्दल दिलीगीरी व्यक्त करूनही विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात गटनेत्यांची बैठक घेऊन त्यात भातखळकरांना समज देण्याचा तोडगा निघाला. आमदारांनी महत्त्वाच्या विषयावर बोलताना मोजून-तोलून शब्दांचा वापर करावा, अशी समज अध्यक्षांनी सदस्यांना या वेळी दिली.

बातम्या आणखी आहेत...