आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राईनपाडा प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार; घटनेतील पीडित कुटुंबांची जबाबदारी सरकारवर : मुख्यमंत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे झालेली घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून पीडितांना लवकर न्याय मिळावा यासाठी हा खटला जलद गती न्यायालयात चालवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पीडित कुटुंबांच्या पुनर्वसनाची जबाबदारी ही सरकारकडे असल्याचे सांगत भटक्या जमातींच्या पुनर्वसनासाठी शासन लवकरच एक सर्वंकष योजना तयार करणार असल्याचेही ते म्हणाले. 


राईनपाड्यात पोरधरी असल्याच्या संशयातून नाथपंथी डवरी गोसावी समाजातील ५ जणांची हत्या करण्यात आली होती. हा मुद्दा मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांनी विधानसभेत उपस्थित केला. घटनेत मृत्युमुखी पडलेले पाचही जण हे आपल्या मतदारसंघातील असल्याचे सांगत दोषींवर कठोर कारवाईची त्यांनी मागणी केली. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भटक्या समाजातील घटकांना सरकारतर्फे ओळखपत्र दिले जावे, अशी मागणीही त्यांनी केली. दुर्दैवाने सरकारकडे राज्यातील अशा समाजघटकांची आकडेवारीच नसल्याचा आरोप करत आगामी काळात समाजाला न्याय देण्यासाठी भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी एक स्वतंत्र आयोग नेमावा, अशी सूचनाही त्यांनी या वेळी केली. 


दोषींना कठोर शिक्षा करून पीडितांना न्याय देणार

भालकेंच्या मुद्द्यावर खुद्द मुख्यमंत्र्यांनी निवेदन केले. या घटनेमुळे माणसांमधील राक्षसी प्रवृत्ती कशी असते, हे पाहायला मिळाले. एका अफवेने ५ जणांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पंचायत समिती सदस्याने दूरध्वनीवरून पोलिसांना खबर दिली. हे गाव धुळ्यापासून ४० किलोमीटर अंतरावर असल्याने जवळपास पन्नास मिनिटांमध्ये पोलिस तिथे पोहोचले. मात्र या घटनेच्या अनेक चित्रफिती पोलिसांना उपलब्ध झाल्या असून अमानुषपणे मारहाण करणाऱ्यांची ओळख पटवून त्यातील प्रत्येकाला अटक केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. या घटनेतील प्रत्येक दोषीला कठोर शिक्षा करून संबंधित कुटुंबांना न्याय दिला जाईल, असेही ते म्हणाले. 


भटकंती करणाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार 
भटकंती करून आपली उपजीविका करणाऱ्या डवरी गोसावी समाजासोबतच अन्य भटक्या समाजांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. या संदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल आणि भटक्या समाजाच्या पुनर्वसनासाठी योजना तयार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. तसेच राईनपाडा घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन राज्य शासन करेल, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... राईनपाडा नरसंहार प्रकरण एक वृद्धही जेरबंद..

बातम्या आणखी आहेत...