आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिशिंगणापूरच्या शनी मंदिरावर आता सरकारचा ताबा, कोरम नसतानाही विधेयक मंजूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- शनिशिंगणापूर देवस्थानात येणाऱ्या भक्तांची संख्या वाढत असून त्यांना सोयी-सुविधा देणे आवश्यक आहे. परंतु देवस्थान समिती या सुविधा देत नसल्याने आणि मिळणाऱ्या देणगीचा गैरव्यवहार रोखण्यासाठी विश्वस्त व्यवस्था सरकारच्या ताब्यात असावी, यासाठी तयार करण्यात आलेले विधेयक बुधवारी रात्री सव्वाबारा वाजता मंजूर करण्यात आले. कोरम नसतानाही आणि शिवसेनेचा एकही सदस्य उपस्थित नसताना हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. 

 

शनैश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था (शिंगणापूर) विधेयक २००८ मंगळवारी रणजित पाटील यांनी सभागृहात मांडले होते. बुधवारी यावर चर्चा होणे अपेक्षित होते. परंतु कामकाज विविध कारणांनी लांबल्याने रात्री सव्वाअकरा वाजता हे विधेयक चर्चेला घेण्यात आले. विधेयक मंजूर करण्यासाठी कोरम नसल्याने बिल गुरुवारी मंजूर करावे, अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली. देवस्थानावर सरकार कब्जा करत असल्याचा शिवसेनेने पायऱ्यांवर आंदोलन करून निषेध केला होता. शिवसेनेचा एकही सदस्य सभागृहात उपस्थित नाही. शिवसेनेला अंधारात ठेवून विधेयक मंजूर का करून घेत आहात, एवढी काय घाई आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.  

 

हिंदू जनजागृती समितीने सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता. मात्र, सर्व विरोध मोडून काढून सरकारने शनैश्वर देवस्थानावर कब्जा मिळवला आहे. राज्यातील कुणीही बनू शकेल. विश्वस्त विधेयक मंजूर झाल्याने आता अध्यक्ष व विश्वस्तांची निवड शासनामार्फतच केली जाणार आहे. पूर्वी शिंगणापूरचा मूळ रहिवासीच विश्वस्त होऊ शकत होता, परंतु  आता 55 वर्षांनंतर राज्यातील कोणीही व्यक्ती शिंगणापूर देवस्थानचा विश्वस्त होऊ शकेल. तसेच मंदिरात येणाऱ्या दानावरही आता सरकारचे लक्ष असणार आहे. येथे येणाऱ्या भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करणे शक्य होणार असून येथील दानाचा भ्रष्टाचारही थांबणार आहे.

बातम्या आणखी आहेत...