Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | Shiv sena MLA and Opposition Angry on Nanar Project Issue In Nagpur

विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ; विरोधासाठी राजदंडाची पळवापळवी, झटापटीत खाली पडले आमदार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 12, 2018, 09:26 AM IST

कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ घातला.

 • Shiv sena MLA and Opposition Angry on Nanar Project Issue In Nagpur

  नागपूर- कोकणातील नाणार प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ घातला. प्रकल्पाविरोधात भूमिका मांडण्याची संधी नाकारल्याने संतापलेल्या शिवसेना आमदारांसह काँग्रेसचे नितेश राणे यांनीही राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. ताे सोडवण्याच्या प्रयत्नात झटापट होऊन विधानसभाध्यक्षांचे चोपदार आणि काही आमदारही खाली पडले. या अभूतपूर्व गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले.


  विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरू केलेल्या चर्चेला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी उत्तर दिले. नंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उत्तर देण्यासाठी उभे राहिले. त्याच वेळी शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी नाणार प्रकल्पाच्या विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा विधान भवनावर आला असल्याने त्याबाबत भूमिका मांडण्याची संधी मिळावी, अशी मागणी केली. मात्र या मागणीला अध्यक्षांनी नकार दिला.


  काँग्रेसही आक्रमक
  शिवसेना आमदार आक्रमक असताना काँग्रेसने नाणारविषयी आपला अगोदर प्रस्ताव असल्याने त्याला प्राधान्य मिळावे, असे सांगत शिवसेनेच्या मागणीला विरोध केला. मात्र, अाम्हालाच बाेलण्याची संधी द्या, अशी मागणी करत शिवसेना आमदारांनी अध्यक्षांच्या आसनाजवळ गोंधळ घालायला सुरुवात केल्याने कामकाज सुरुवातीला दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. त्यानंतर तब्बल चारदा सभागृह तहकूब झाले.


  एकमेकांचे कट्टर विराेधक राणे- शिवसेनेची अनाेखी ‘युती’
  कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर शिवसेना आमदारांनी नाणार प्रकल्प हद्दपार झालाच पाहिजे, अशी घोषणा लिहिलेले बॅनर सभागृहात आणून अध्यक्षांच्या आसनाजवळ घोषणाबाजी सुरू केली. या वेळी काँग्रेसचे नितेश राणेही नाणारविरोधात घोषणा देत तेथे पोहोचले. काही कळायच्या आत राणे यांनी अध्यक्षांच्या आसनासमोरील राजदंडाकडे धाव घेतली. लगेच शिवसेनेचे प्रकाश सुर्वे, प्रताप सरनाईक, वैभव नाईक, राजन साळवी या आमदारांनीही राजदंड हाती घेतला. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या चोपदारांनीही तो घट्ट धरून ठेवला. दहा सेकंद झटापट सुरू राहिली. राजदंडाच्या खेचाखेचीत अध्यक्षांचे चोपदार व काही आमदार चक्क खाली पडले.


  प्रकल्प होऊ देणार नाही
  आमदार राजन साळवी म्हणाले, ‘नाणार प्रकल्पावरून शिवसेनेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाल्याने आम्हाला नाइलाजाने राजदंड पळवण्याचा प्रयत्न करावा लागला. मुख्यमंत्री काहीही सांगत असले तरी नाणार प्रकल्प कदापिही कोकणावर लादू देणार नाही.’


  सत्ताधारी राजदंड कसे पळवू शकतात?
  राजदंड पळवण्याचा प्रयत्न प्रथम कोणी केला, यावरून काँग्रेसचे नितेश राणे आणि शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात श्रेय घेण्यावरून दावे-प्रतिदावे सुरू झाले. कोकणच्या जनतेचा आवाज मांडण्यासाठी मी प्रथम राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवसेनेचे आमदार आले, असा दावा राणे यांनी केला. सत्ताधारी शिवसेना राजदंड कसा पळवू शकते, असा सवालही त्यांनी केला.

Trending