आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अख्खी भगवद््गीता पाठ असल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा दावा, परंतु, एक ओळही म्हणता येईना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना गुरुवारी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर चांगलाच घाम फुटला. निमित्त ठरला तो एका पत्रकाराने विचारलेला प्रश्न. संपूर्ण गीता पाठ असल्याची फुशारकी अंगलट आल्याने आव्हाड बोलणे विसरून गेल्याचेही माध्यमांनी टिपले. महाविद्यालयांत गीतेचे वाटप करण्यात आल्याचा आरोप करत आव्हाड माध्यमांसमोर बोलत होते. या वेळी त्यांनी गीतेतील श्लोकाची एक ओळ म्हणून दाखवली; पण ती म्हणतानाही चुकले. वाक्य चुकीचे म्हणून झाल्यावर ते म्हणाले, 'त्यांच्यापेक्षा (भाजपपेक्षा) जास्त गीता मला तोंडपाठ आहे. ती अख्खी म्हणण्याची शक्ती आम्हालाही आहे. तेवढे आम्हाला पण शिकवले आहे आमच्या आई-वडिलांनी.' 


हा दावा केल्याने एका पत्रकाराकडून दोन मिनिटे गीता म्हणून दाखवण्यासंदर्भात विचारणा झाली त्या वेळी आव्हाडांची भंबेरी उडाली. 'बाइटवर चालणार नाही. तुम्ही बाजूला या, म्हणून दाखवतो,' असे म्हणत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्रकाराच्या प्रश्नामुळे त्यांची गाडी घसरली. आपण काय बोलत होतो याचेच त्यांना विस्मरण झाले. या वेळी त्यांनी संबंधित पत्रकाराला उद्देशून अपशब्दही काढले. त्या पत्रकाराने नंतर आव्हाडांशी संपर्क साधला. मात्र, याही वेळी संपूर्ण गीता तोंडपाठ असल्याची फुशारकी मारणाऱ्या आव्हाडांना गीतेतले श्लोक दोन मिनिटे म्हणून दाखवता आले नाहीत. दरम्यान, इलेक्ट्रॉनिक माध्यमांसमोर आव्हाडांचे हसे झाल्याची चर्चा विधानभवन आवारात रंगली होती. राजकीय क्षेत्रातील मंडळी याचा आनंद घेताना दिसली. 


राज्य सरकारचा गीता वाटपाशी संबंध नाही 
'भक्ती वेदांत बुक ट्रस्ट, भिवंडी यांच्यामार्फत भगवद् गीता संचाच्या १८ खंडांचे मोफत वाटप महाविद्यालयांना करण्यात आले आहे. ते शासनामार्फत झालेले नाही. ते वाटप करण्याबाबत कोणतेही परिपत्रक शासनाने काढलेले नाही. केवळ महाविद्यालयांची यादी भक्ती वेदांत ट्रस्टला उपलब्ध करून देण्यात आली. यासाठी शासनाने ट्रस्टला कोणतेही पैसे दिलेले नाहीत, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे. 


तर बायबल-कुराण वाटपासही परवानगी 
"काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी विचारसरणीचे आमदार चुकीचा प्रचार करत असून, भगवद् गीता वाईट आहे आणि त्याचे वाटप करू नये, असे त्यांनी जाहीर करावे. त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. जर कोणी कुराण, बायबलचे वाटप करण्याची विनंती केली तर त्यासाठीही परवानगी देण्यात येईल.
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री, महाराष्ट्र.

बातम्या आणखी आहेत...