आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्रकार गणेश देशमुख यांचे अपघातात निधन; लोणीजवळ अज्ञात वाहनाने दिली दुचाकीला धडक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- अकोला येथील लग्न समारंभ आटोपून दुचाकीने अमरावतीकडे येताना अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत मुळचे मूर्तिजापूरचे रहिवासी, पत्रकार गणेश दिनकरराव देशमुख (२७) यांचे निधन झाले. या अपघातात त्यांचा मित्र जखमी झाला. हा अपघात महामार्गावर लोणीजवळ शनिवारी २८ एप्रिलला रात्री साडेअकरा वाजता झाला. 


गणेश देशमुख हे मूर्तिजापूर येथे दै. दिव्य मराठीचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते. ते विधी महाविद्यालयात शिकत होते. काही महिन्यांपूर्वी शिक्षणासाठीच ते मुर्तिजापूरवरून अमरावतीत राहायला आले होते. शेगाव नाका भागातील 'महादेवक्रिष्ण' अपार्टमेंटमध्ये त्यांचे वास्तव्य होते. शनिवारी ते वैभव इंगळे या मित्रासह अकोल्याला लग्नासाठी गेले होते. रात्री अकोल्यावरून अमरावतीला नव्या पल्सर दुचाकीने परत येत होते. लोणीनंतर बडनेराच्या दिशेने दोन किलोमीटर आल्यावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गणेश व त्यांचा मित्र दोघेही कोसळले. त्यात गणेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर मित्र जखमी झाला होता. अपघाताची माहिती मिळताच लोणी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्याचवेळी १०८ रुग्णवाहिकेने दोघांनाही इर्विन रुग्णालयात पाठवले मात्र प्रकृती गंभीर असल्यानेे दोघांनाही इर्विनमधून खासगी रुग्णालयात नेले. तिथे गणेश यांचा मृत्यू झाला. रविवारी २९ एप्रिलला गणेश यांच्या पार्थिवावर हिंदू स्मशान भूमित अंत्यसंस्कार केले. त्यांच्या मागे आई, भाऊ, विवाहित बहीण व परिवार आहे. 


हिंदू स्मशान भूमीत गणेश देशमुख यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार केला. या वेळी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे, यवतमाळ जि. प.चे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, मूर्तिजापूरचे तहसीलदार राहुल तायडे, अकोल्याचे माजी महापौर विनोद मापारी, अविनाश देशमुख, डॉ. अनिल डोनारकर, सचिन देशमुख, अमरावतीचे डॉ. देशमुख विधी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, मूर्तिजापूर,अमरावतीचे पत्रकार नागरिक उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...